शिरवळ येथील नीरा नदीपात्रात आढळला मानवी सांगाडा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील शिरवळ येथे एक खळबळजनक घटना घडली आहे. येथील गोलघुमटाजवळील नीरा नदीपात्रात सडलेल्या अवस्थेमध्ये मानवी पुरुष जातीचा एक सांगाडा आढळून आला आहे. सदर सांगाडा 30 ते 35 वयोगटातील असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. या घटनेमुळे शिरवळ परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत घटनास्थळ व शिरवळ पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, शिरवळ हद्दीमध्ये मांड नावाचा एक ओढा आहे. या ओढ्याच्या पुढे नीरा नदीपात्र असून सध्या नीरा नदीची पाणी पातळी कमी झाली आहे. त्यामुळे पाणी उपसा करणारी मोटर पाण्यामध्ये टाकण्याकरिता एक शेतकरी नीरा नदीपात्रात उतरला होता. यावेळी मोटरची पाहणी करताना संबंधित शेतकऱ्याला नीरा नदीपात्रातील डोहात एक मानवी सांगाडा सडलेल्या अवस्थेमध्ये दिसून आला.

त्यानंतर संबंधित शेतकऱ्याने शिरवळ पोलिस ठाण्यात याबाबत माहिती दिली. माहितीनंतर शिरवळचे पोलिस निरीक्षक नवनाथ मदने, पोलिस उपनिरीक्षक सतीश आंदेलवार, पोलिस अंमलदार संजय सकपाळ, छगन शेडगे, शिवराज जाधव यांनी शिरवळ रेस्क्यू टीमच्या सदस्यांसह घटनास्थळी धाव घेतली.

संपूर्ण सडलेल्या अवस्थेमध्ये मानवी सांगाडा असल्याचे व त्याच्या हातामध्ये दोरा असल्याचे त्यांना आढळून आले. यावेळी शिरवळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कीर्ती पवार यांनी घटनास्थळीच संबंधित सांगाड्याची उत्तरतपासणी केली. संबंधित मृतदेह कोणाचा आहे, याबाबतचा तपास शिरवळ पोलिसांकडून सुरू आहे. शिरवळ पोलिस ठाण्यात याची नोंद झाली असून, पोलिस अंमलदार छगन शेडगे तपास करीत आहेत.