व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

हजारो भाविकांच्या उपस्थितीत बावधनची बगाड यात्रा उत्साहात

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
‘काशिनाथाच्या नावानं चांगभलंऽऽ’च्या गजरात वाई तालुक्यातील बावधन येथील ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथाच्या बगाडाची मिरवणूक रविवारी मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी हजारो भाविकांनी बगाड पाहण्याचा आनंद घेतला. राज्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाणारी सातारा जिल्ह्यातील बगाड यात्रा म्हणून नाव आहे.

बावधन गावाच्या पूर्वेस सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या कृष्णातीरावरील सोनेश्वर येथून सकाळी साडेबारा वाजण्याच्या सुमारास बगाड मिरवणुकीस प्रारंभ झाला. त्यापूर्वी बगाड्या दिलीप शंकर दाभाडे यांना नदीत स्नान घालून देवदेवतांची विधिवत पूजा-आरती करण्यात आली. त्यानंतर बगाड्यास पारंपरिक पोशाख घालून बगाड्याला झोपाळ्यावर बसविण्यात आले.

यावेळी भाविकांनी नोटा व नारळाची तोरणे, झेंडे, नवसाचे गोंडे बगाडाच्या शिडाला बांधले. बगाड म्हणजे दोन मोठी चाके असलेला रथ. या रथावर सुमारे तीस-चाळीस फूट उंचीच्या शिडावर झोपाळ्याच्या साह्याने बगाड्यास चढविण्यात येते. यावर्षी हा मान दिलीप शंकर दाभाडे यांना मिळाला. या बगाड्याला घेऊन हे 20 फूट उंच बगाड गावापासून 5 किलोमीटर लांब असणाऱ्या सोनेश्वर मंदिरापर्यंत बैलांच्या मदतीने ओढण्यात आली.

साडे तीनशे वर्षापासून या गावात ही यात्रा साजरी केली जाते. बगाड रथाच्या मागे वाघजाईदेवी, भैरवनाथ आणि ज्योतिबाची पालखी सुशोभीत करून ठेवण्यात आली होती. त्याचे भाविक दर्शन घेत होते. काही ठिकाणी बगाड थांबवून विश्रांती घेण्यात येत होती. यावेळी पाच फेऱ्या घालण्यात येत होत्या.