कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी
कराड तालुक्यातील बेलवडे बुद्रुक येथे बिबट्याचा मृत्यूू झाल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली आहे. मृत्यू झालेल्या बिबट्याच्या बछड्याचे वय सुमारे तीन वर्षाचे वय असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास येत आहे. याबाबतची माहिती ग्रामस्थ्यांकडून वनविभागाला देण्यात आली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, कराड तालुक्यातील बेलवडे बुद्रुक येथील शिवारात बुधवारी सकाळी 10 वाजता ऊसाच्या शेतात वैरण काढायला गेलेल्या बेलवडे बुद्रुक येथील शेतकरी शिवाजी बाळासो पवार यांना शेतात बिबट्या मृतावस्थेत पडला असल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ याबाबतची माहिती ग्रामस्थांना दिली. त्यानंतर बिबट्याला पाहण्यासाठी शिवारात ग्रामस्थांनी गर्दी केली. त्यानंतर ग्रामस्थांनी बिबट्याबाबतची माहिती वन विभागाला दिली.
सदर बिबट्याचा मृत्यू हा दोन-तीन दिवसांपूर्वी झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला असून परिसरात दुर्गंधी पसरली असल्याने त्याठिकाणी शेतकऱ्याने जाऊन पाहिले असता त्या ठिकाणी बिबट्याचा मृत्यू झाल्याचे त्याला दिसून आले. दरम्यान, बेलवडे बुद्रुकसह परिसरातील गावांमध्ये काही दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याचे स्थानिक ग्रामस्थांना निदर्शनास आले होते.
काही दिवसांपूर्वीच बेलवडेमध्ये शेतातील वस्तीवर बिबट्याने हल्ला करून कुत्रे फस्त केल्याची घटना घडली होती. या परिसरात वारंवार बिबट्याचे होणारे हल्ले व ग्रामस्थांना प्रत्यक्ष बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे वनविभागाने यावर ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी बेलवडेसह कासारशिरंबे, मालखेड, कालवडे, कासेगाव, वाठार ग्रामस्थांकडून होत आहे.