पाटण | मंद्रुळहवेली येथील कोयना नदीत एकजण बुडाला आहे. गेल्या तीन दिवसापासून शोधमोहिम सुरू असून अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. मंद्रुळहवेलीच्या यात्रेदिवशीच हा प्रकार झाल्याने नदिकाठी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. काशिनाथ केशव मोरे (वय-53, रा. ठोमसे, ता. पाटण) असे बुडलेल्या संशयिताचे नाव आहे. या नदीत काही दिवसापूर्वी सात फूटी मगर दिसली होती.
घटनास्थळावरुन मल्हारपेठ पोलिसांकडुन मिळालेली माहिती अशी, मंद्रुळहवेली येथील कोयना नदीकाठी ठोमसे येथील काशिनाथ मोरे हे तीन दिवासापूर्वी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास अंघोळ करण्यास गेले होते. तेव्हा पोहता पोहता ते बुडाले. घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी त्यास बुडताना पाहिल्याचे सांगितल्याने घटनास्थळी मल्हारपेठ पोलिस ठाण्याचे हवलदार एन. के. कांबळे यानी धाव घेतली. सदरच्या घटनेची माहिती घेवुन मोरे यांच्या कुटूंबियाना याबाबतची कल्पना देण्यात आली. कुटुंबियानी त्याचे कपडे, बूट आणि खिशातील आधारकार्ड पाहिले असता, बुडालेले गृहस्थ ठोमसेतीलच असल्याचे सिद्ध झाले. दरम्याण मंद्रुळहवेली येथील कोळी समाजातील युवकानी तब्बल नदीत एक तास शोध घेतला असता त्याचे हाती काही लागले नाही. अखेर आज ट्रेकर्संनी कोयना नदीत शोध मोहिम राबवली आहे.
सात फूट मगर नदीत
गेल्याच आठवड्यात मंद्रुळहवेली येथे तब्बल सात फुट मगर नदी किनारी पहावयास मिळाली होती. बुडालेले गृहस्थ हे पोहण्यात तरबेज असल्याचे कुटुंबियांनी सांगितले. यामुळे सदरचे ग्रहस्थ बुडाले कि मगरीच्या तावडीत सापडले याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.