लग्नास नकार दिला म्हणून केला अल्पवयीन मुलीवर चाकूने वार; परप्रांतीय तरूणाला अटक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

साताऱ्यात एका 16 वर्षीय शाळकरी मुलीने लग्नास नकार दिल्याच्या कारणावरून तिच्यावर चाकूने वार करण्यात आल्याची घटना घडली. यावेळी झालेल्या हल्ल्यात मुलगी जखमी झाली असून याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी ओरिसा राज्यातील एका परप्रांतीय तरूणाला अटक केली आहे. या घटनेमुळे साताऱ्यात खळबळ उडाली आहे.

विवेक नरहरी शेट्टी (वय 23, मूळ रा. राज्य ओरिसा, सध्या रा. करंजे पेठ, सातारा) असे अटक करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, पीडित 16 वर्षांची मुलगी 23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता अपार्टमेंटच्या टेरेसवर अभ्यास करत होती. त्यावेळी परप्रांतीय तरुण विवेक हा तेथे गेला. ‘तुझे माझ्यावर प्रेम आहे का? मला आता सांग आणि तू माझ्याबरोबर लग्न करणार आहेस का नाही? ते पण सांग.’ असे त्याने मुलीला विचारले. यावर मुलीने ‘अजून मी लहान आहे. मला अजून शिकायचे आहे. माझ्या आई-वडिलांना असे काही केलेले आवडणार नाही. म्हणून मी तुझ्याबरोबर लग्न करू शकत नाही, असे उत्तर दिले.

मुलीचे उत्तर ऐकताच चिडलेल्या विवेक शेट्टी या संशयितांने तिला जवळ ओढून तिच्या गळ्यावर आणि पोटात चाकूने भोकसले. तरुणाच्या हल्ल्यात युवती जखमी झाली. त्यानंतर घरच्या मंडळींनी तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यानंतर या घटनेची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळताच त्यांनी तत्काळ त्या तरुणाला ताब्यात घेतले. तसेच संबंधित तरुणावर खुनाचा प्रयत्न करणे, पोक्सो, विनयभंग, आत्महत्येचा प्रयत्न करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला.