पंतप्रधान मोदींसाठी खास बनवलेलं ‘एअर इंडिया वन’ विमान पुढील आठवड्यात भारतात

नवी दिल्ली । अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या एअर फोर्स-वन या विशेष विमानाप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही ‘एअर इंडिया वन’ची सेवा दिली जाईल. बोईंगच्या डलास येथील प्रकल्प स्थळावर ७७७-३०० ईआर या विमानांची बांधणी करण्यात आली असून या विमानाची डिलेव्हरी घेण्यासाठी मागील आठवड्यामध्येच भारताचे काही अधिकारी अमेरिकेला रवाना झाल्याचे वृत्त एएनआयच्या हवाल्याने देण्यात आलं होतं. आता पुढील आठवड्यांमध्ये हे विमान भारतात दाखल होणार असल्याचे ‘द प्रिंट’ने म्हटलं आहे.

राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांव्यतिरिक्त कोणालाही या विमानाचा वापर करता येणार नाही. सध्या राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान परदेश दौऱ्यावर जाण्यासाठी एअर इंडियाच्या विमानाचा वापर करतात. त्यांच्या छोटया दौऱ्यासाठी इंडियन एअर फोर्सच्या व्हीव्हीआयपी ताफ्यातील विमानांचा वापर केला जातो. बोईंग ७७७ हे विशेष सुरक्षा प्रणालीने सज्ज असलेले भारतातील पहिले विमान ठरणार आहे.

कामकाजाच्या सुलभतेसह सुरक्षेचा दृष्टीने या विमानाची रचना करण्यात आली आहे. जून २०२० पर्यंत ही विमाने भारताला मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार या दोन्ही विमानांची एकंदरित किंमत ८ हजार ४५८ कोटी रुपये इतकी आहे. २००५ साली बोईंगकडून ६८ विमाने विकत घेण्यासंदर्भात जो निर्णय घेण्यात आला होता त्यामध्येच या दोन विमानांच्या खरेदीला मंजुरी देण्यात आली होती. या विमानांवर भारत असं लिहिलेलं असेल तसेच यावर अशोचक्रही असेल.

मोदींसाठी बनवण्यात येत असलेली ही दोन्ही विमाने मिसाइल डिफेन्स सिस्टिमने सुसज्ज असतील. शत्रूचा क्षेपणास्त्र हल्ला परतवून लावण्यात सक्षम असतील. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे बोईंग ७४७-२०० बी जितके सुरक्षित आहे तितकेच हे विमान सुद्धा सुरक्षित असेल.शत्रूचे रडार जॅम करण्यासह क्षेपणास्त्र हल्ला परतवून लावण्यास हे विमान सक्षम असेल. नव्या विमानातील मिसाइल डिफेन्स सिस्टिम एअर इंडियाऐवजी इंडियन एअर फोर्सच्या नियंत्रणाखाली रहाणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने जबाबदारीत बदल करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. मिसाइल डिफेन्स सिस्टिम म्हणजे शत्रूने डागलेल्या क्षेपणास्त्रापासून रक्षण करणारी यंत्रणा.

अमेरिका, रशिया, तैवान, भारत, चीन आणि इस्रायलने अशी सिस्टिम विकसित केली आहे. एअर फोर्स वनच्या दिशेने येणाऱ्या क्षेपणास्त्राचा मार्ग बदलण्याची यंत्रणा डिफेन्स सिस्टिममध्ये असेल. आयएएफकडे या विमानाचे नियंत्रण गेले तर ‘एअर इंडिया वन’ऐवजी ‘एअर फोर्स वन’ म्हणून हे विमान ओळखले जाईल. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे विशेष विमान एकदा इंधन भरल्यानंतर सलग १७ तास उड्डाण करु शकते. हे विमान एखाद्या नियंत्रण कक्षाप्रमाणे काम करण्यास सक्षम आहे. सर्व आधुनिक तंत्रज्ञान वापरुन तयार करण्यात आलेल्या या विमानामधून कोणत्याही प्रकारच्या हॅकींग किंवा टॅपिंगच्या भीतीशिवाय ऑडिओ आणि व्हिडिओ संवाद साधता येणार आहे. सध्या भारताकडे असणाऱ्या व्हिआयपी विमानांना १० तासांच्या उड्डाणानंतर इंधन भरण्यासाठी उतरावं लागायचं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”