पाटणला शुक्रवारी एक दिवसीय ग्रंथ महोत्सव व साहित्य संमेलन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटण | स्वातंत्र्य सैनिक स्व. बाळासाहेब उर्फ भाई भडकबाबा पाटणकर यांच्या स्मृती दिनानिमित्त शुक्रवार दि. 3 फेब्रुवारी रोजी पाटणमध्ये एक दिवसीय सातवे ग्रंथ महोत्सव व साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. याचा लाभ पाटण व पंचक्रोशीतील साहित्यप्रेमी, रसिक व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन प्रमुख संयोजक विक्रमबाबा पाटणकर यांनी केले आहे.

येथील स्वातंत्र्य सैनिक भाई भडकबाबानगर येथे एक दिवसीय साहित्य संमेलनात शुक्रवार दि. 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.15 वाजता पाटण शहरातून भव्य ग्रंथदिंडी व शोभा यात्रा होणार असून यामधे पाटण शहर व परिसरातील शाळा व झांझपथकाचा समावेश असणार आहे. तर सकाळी 10 वाजता उद्‌घाटन समारंभ होणार असून यावेळी अध्यक्षस्थानी आयएएस उपमहासंचालक यशदा पुणेचे प्रताराव जाधव व प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व दै. पुढारीचे कार्यकारी संपादक कोल्हापूरचे श्रीराम पचिंद्रे हे उपस्थित असणार आहेत. दुपारी 12 वाजता कै. स्वातंत्र्य सैनिक भाई भडकबाबा पाटणकर यांच्या स्मृती दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे माजी अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. वसंतराव जुगळे यांचे शेतीविषयक मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे. यावेळी अध्यक्षस्थानी बलशाली युवा हृदयमंच संस्थापक अध्यक्ष चिपळूणचे शिरीष काटकर व पुणेचे उद्योजक प्रल्हादराव देसाई यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. दुपारी 2 वाजता नाट्य लेखक व कवी जगन्नाथराव गार्डे यांच्या उपस्थितीत केवळ निमंत्रित कविंचे कवी संमेलन होणार आहे. यावेळी प्रा. सौ. विजया म्हासुर्णेकर यांची उपस्थिती असणार आहे. सायंकाळी 4 वाजता साहित्य संमेलनाचा समारोप होणार असून अध्यक्षस्थानी दै. तरूण भारतचे सांगली आवृत्ती प्रमुख शिवराज काटकर व ज्येष्ठ ग्रंथालय कार्यकर्त्या, ग्रंथपाल सातारच्या सुनीता कदम प्रमुख पाहुण्या असणार आहेत. तद्‌नंतर यावेळी पारितोषिक वितरण व विविध गुणदर्शनाचा कार्यक्रमही होणार आहे.

पाटण तालुक्याच्या सांस्कृतिक विकासास पोषक ठरणारा ग्रंथ महोत्सव आणि साहित्य संमेलन हा लोकप्रिय उपक्रम यंदा सातव्या वर्षात पर्दापण करत आहे. तरी या साहित्य संमेलनाचा लाभ पाटण व पंचक्रोशीतील साहित्यप्रेमी व रसिकांनी तसेच नागरिकांनी घ्यावा, असे आवाहनही विक्रमबाबा पाटणकर यांनी केले आहे.