हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काल उत्साहपूर्ण वातावरणात गणरायाचे विसर्जन करण्यात आले. गणरायाच्या विसर्जनानंतर आज पहाटेच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली असून पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील वनवासमाची-वहागाव हद्दीत सर्व्हिस रस्त्यावर नाल्यामध्ये अर्धवट जळालेला पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून तळबीड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जळालेल्या अवस्थतेत मृतदेह आढळून आल्यामुळे घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील तळबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वनवासमाची-वहागाव, ता. कराड या गावच्या हद्दीत आज पहाटेच्या सुमारास काही ग्रामस्थांना अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. त्यांनी याबाबतची माहिती तात्काळ तळबीड पोलिसांना दिली. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच तळबीड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वरोटे हे घटनास्थळी दाखल झाले.
त्यांच्यासह पोलीस कर्मचाऱ्यांकडून मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केले जात आहेत. तसेच जिल्ह्यातील मिसिंगच्या नोंदींची माहिती घेतली जात आहे. मृतदेहाची ओळख पटल्यानंतरच या प्रकरणातील धागेदोरे हाती येणार आहेत. त्यामुळे पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटविण्यासह गोपनीय माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान या घटनेमागे घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे.