महाबळेश्वर | रान डुक्कराच्या शिकारीसाठी पेरून ठेवलेला गावठी बॉम्ब तोंडात फुटल्याने एक पाळीव कुत्रा जागीच ठार झाल्याच्या घटनेने शहरात चांगलीच खळबळ माजली आहे. जर हा बॉंम्ब लहान मुलाच्या हाती पडला असता, तर मात्र मोठा अनर्थ ओढवला असता. वन विभाग बॉंम्ब ठेवणाऱ्या अज्ञात शिकाऱ्याचा शोध घेत आहे.
येथील गणेश नगर हौ सोसायटी जवळच माउंट डग्लस हा बंगला आहे. या बंगल्याच्या मागे छोटे मैदान आहे. या मैदानावर सोसायटीतील मुले क्रिकेट खेळण्यास नियमित जात असतात. याच ठिकाणी स्वप्नील गजानन फळणे हा देखिल मुलांबरोबर क्रिकेट खेळायला जातो. स्वप्नील हा खेळायला जाताना आपल्या बरोबर आपले कुत्रे घेवुन जातो. मुलं क्रिकेट खेळण्यात मग्न असताना स्वप्नीलचा कुत्रा जवळच्या जंगल परीसरात फिरत होता. त्या परिसरात अन्नाचे खरखटे पडले होते. तेथे अन्न पदार्थाच्या वासाने कुत्रे आकर्षित झाले आणि त्याने ते खाण्यास सुरूवात केली. त्याच खादय पदार्थात काही अज्ञात शिकारी लोकांनी गावठी बॉंम्ब ठेवला होता. कुत्र्याने बॉंम्ब तोंडात घेताच बॉंम्बचा स्फोट झाला. या स्फोटाने कुत्र्याच्या तोंडाच्या चिंधडया उडाल्या व तो कुत्रा जागीच ठार झाला. स्फोटाचा आवाज ऐकताच क्रिकेट खेळणारी मुले त्या आवाजाच्या दिशेने धावत गेली. परंतु तिथे पोहचल्यावर सर्वांनाच धक्का बसला. स्वप्नीलचा कुत्रा रक्ताच्या थारोळयात पडला होता.
बाॅम्ब ठेवणारे शिकारी याच सोसायटी मधील असावेत असा अंदाज स्थानिकांनी व्यक्त केला आहे. बॉंम्ब ठेवुन प्राण्यांना आकर्षित करण्यासाठी बॉंम्बवर खादय पदार्थ टाकायचे, खरकटे टाकायचे व प्राण्यांची शिकार करून त्याचे मांस खायचे अशी युक्ती शिकारी यांची होती. परंतु या ठिकाणी जंगली प्राण्या ऐवजी आज कुत्रे सापडले. उदया जर मुलांच्या हाती हा बॉंम्ब पडला असता, तर मोठा अनर्थ ओढवल्या शिवाय राहणार नाही. या संदर्भात स्वप्नील फळणे यांनी महाबळेश्वर वन विभागात आपली तक्रार दाखल करून अज्ञात शिकारी यांचेवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. महाबळेश्वर येथील वनविभागातील कर्मचारी आता अज्ञात शिकारी यांचा शोध घेत आहेत.