कराड | कराड तालुक्यातील धोंडेवाडी येथे शेतातील गवत उपटल्याच्या कारणावरुन पोलीस हवालदाराला खुरप्याने मारहाण करुन जखमी करण्यात आले. मंगळवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबत पोलीस हवालदार कृष्णा बाबु काकडे यांनी कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन शंकर जगन्नाथ काकडे याच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कराड पोलिसांनी दिलेली माहिती अशी, हवालदार कृष्णा काकडे हे धोंडेवाडी येथील रहिवासी असून गावी त्यांची शेतजमिन आहे. बुधवारी शेतात खुरपणी करण्यासाठी ते गेले होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ते मजुरांना मजुरी ठरवित असताना शंकर काकडे त्याठिकाणी आला. मी लावलेल्या घास गवताच्या कांड्या का उपटल्या, असे त्याने विचारले.
यावेळी माझ्या हद्दीत कांड्या असल्यामुळे मी त्या उपटल्या, असे कृष्णा काकडे यांनी सांगीतले. मात्र, यावरुन चिडून जाऊन शंकर काकडे याने हातातील खुरप्याने कृष्णा काकडे यांच्या कपाळावर मारहाण केली. त्यामध्ये ते जखमी झाले. तसेच या वादावादीत त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैनही गहाळ झाली. याबाबतची नोंद कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात झाली आहे.