सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके
पोलिस अधिकारी असल्याचे भासवून दोघा भामट्यांनी निवृत्त तहसीलदारांचे साडेचार लाख रुपयांचे दागिने पळविले. गोडोली परिसरातील हॉटेल समुद्रसमोर ही घटना घडली. याबाबत शंकरराव तुकाराम मुसळे (वय- 82, रा. साईकृपा गिरिचिंतन कॉलनी, विलासपूर) यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
शंकरराव मुसळे हे सायंकाळी रस्त्यावरून चालत निघाले होते. त्यावेळी गोडोलीतील हॉटेल समुद्रसमोरील रस्त्यावर आल्यानंतर त्यासमोर दोन युवक आले. त्यातील एकाने ‘मी क्राइम ब्रँचचा पोलिस आहे. येथे चोऱ्या होत आहेत. तुमचे दागिने काढून द्या,’ असे त्यांना सांगितले.
दुसऱ्या तरुणाने हातचलाखीने त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी व अंगठ्या काढून घेतल्या. हे दागिने रुमालात बांधून देतो, असे म्हणून त्या तरुणाने रुमाल व टिश्शूपेपरमध्ये गुंडाळून त्यांच्या हातात दिला. त्यानंतर दोघेही चोरटे तेथून दुचाकीवरून पसार झाले. काही अंतर पुढे गेल्यानंतर मुसळे यांनी रुमाल उघडून पाहिला असता. त्यामध्ये दगड आढळून आले. फसवणूक झाल्याचे समजल्यावर त्यांनी हा प्रकार घरातल्यांना सांगितला. त्यानंतर याबाबत फिर्याद दिली.