लहान मुलांसाठी कोविड हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र वार्ड राखीव ठेवावा ः खा. श्रीनिवास पाटील

0
41
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

जिल्ह्यातील लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी योग्य नियोजन, प्रशासकीय यंत्रणा व नागरिकांमधील समन्वय साधून प्रत्येक नागरिकांपर्यत लस पोहचवावी. कोरोनाचा प्रादुर्भाव लहान मुलांसाठी धोकादायक ठरत असल्याने त्यांच्यासाठी कोविड हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र वार्ड राखीव ठेवण्यात यावेत यासह अन्य महत्वाच्या सूचना खा.श्रीनिवास पाटील यांनी केल्या.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सातारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक पार पडली. यावेळी खा.श्रीनिवास पाटील यांनी आपल्या सूचना मांडल्या. याप्रसंगी जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बंसल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, अतिरिक्‍त जिल्‍हाधिकारी रामचंद्र शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध आठल्ये, सिव्हिल सर्जन डॉ.सुभाष चव्हाण, श्री.सारंग पाटील, अन्य मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.

खा.श्रीनिवास पाटील म्हणाले, जिल्ह्यात करोना बाधित रुग्णांची संख्या वाढत असून  कोरोनाचा लहान मुलांमध्येही प्रादुर्भाव वाढत चालला आहे. ही चिंतेची बाब असून त्यासाठी वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहे. संभाव्य धोका लक्षात घेता जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील हॉस्पिटलमध्ये  लहान मुलांसाठीचे स्वतंत्र वार्ड आत्तापासूनच तयार केले गेले पाहिजेत. लहान मुलांच्या विशेष गरजा असल्याने त्या अनुशंगाने खासबाब म्हणून तशी तात्काळ कार्यवाही करण्यात यावी.

कोरोनाच्या या भीषण काळात दुर्दैवाने जी मुले आई-वडिलांच्या निधनानंतर अनाथ झाली आहेत. अशा अनाथ मुलांची व्यवस्था करणे गरजेचे तर आहेच तसेच ते आपले कर्तव्य देखील आहे. त्यामुळे त्यांच्या देखभालीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सदर अनाथ मुलांची व्यवस्था एखाद्या स्वयंसेवी संस्थेमध्ये करावी जेणेकरून त्यांचे संगोपन उत्तम होईल.

खासदार पाटील यांची पीएम नंतर सीएम फंडला मदत

खा.श्रीनिवास पाटील यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 साठी वैयक्तीक मदतीचा आपल्या पगाराचा 1 लाखाचा धनादेश जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे यावेळी सुपूर्द केला. आतापर्यंत खा. पाटील यांनी पीएम फंडला 1 लाख रूपये तर कोरोनाच्या पहिल्या लाटेत जवळपास 13 लाख रूपयांची गरजूंना मदत केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here