लोकं अशीच जळून मरतील..आपण तमाशा पाहायचा का…?; मुळशी आग दुर्घटनेवर प्रविण तरडेंचा भडका

Pravin Tarde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या सोमवारी पुण्यातील मुळशी तालुक्यात असणाऱ्या एका सॅनिटायझर कंपनीला आग लागल्याची दुर्देवी घटना घडली. या दुर्घटनेत तब्बल १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेबाबत मराठी अभिनेता व लेखक प्रवीण तरडे यांनी अतिशय संताप व्यक्त केला आहे. इतकेच नव्हे तर त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे. तेथील परिस्थिती पाहून प्रविण तरडेंचा राग अनावर झाला व त्यांनी आपण असाच तमाशा पाहायचा का..? असा खडा सवाल उपस्थित केला आहे. यावेळी अभिनेता व मनसे चित्रपट सेना नेते रमेश परदेसी देखील उपस्थित होते. त्यांच्या फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून या तरडेंच्या संतप्त प्रतिक्रिया समोर आल्या आहेत.

https://www.facebook.com/advramesh.pardeshi/videos/4368555526512690

 

प्रविण म्हणाले की, ४० बाय ४० च्या जागेत ३८ माणसे काम करतात का कधी? आपली आई, बहिण, भाऊ, नवरा, बायको ज्या कंपनीत कामाला आहेत, त्यांना हात जोडून विनंती करा की आम्हाला तुमची कंपनी पाहुद्या. प्रत्येकाने कंपनी आतमध्ये जाऊन पाहिली पाहिजे. मुळशीतील प्रत्येक सरपंच आणि उपसरपंचाला मी विनंती करतो कंपन्यांच्या आत जा आणि आपले भाऊबंध कसे काम करतात ते पहा. नाहीतर तेही महिन्याभरांनी, वर्षांनी जळून मरतील आणि आपण हा तमाशा पाहत बसायचा का?’ बरं तक्रार कोणाची ही नाही. पण सध्याच्या परिस्थितीत प्रशासनावर अवलंबून राहू नका. जिथे आपले नातेवाईक काम करतात तिथे जाऊन ते कसे काम करतात हे पाहणे आपली जबाबदारी आहे. मी पोरांना विनंती करतो की दहा ठिकाणी मुळशी तालुक्याची रग माहिती आहे तिच रग आता आपल्या आई बापासाठी दाखवा. कंपन्यांच्या आत जाऊन. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्यांमध्ये इथल्या मालकांना घेऊन जा आणि त्यांना दाखवा तिथले लोक कसे काम करतात.

https://www.facebook.com/pravin.tarde.9/posts/4263971093624133

 

इतकेच नव्हे तर, ज्या कंपनीला आग लागली त्याच्या बाजूच्या इंडस्ट्रीजमध्ये मी तीन वर्षे कामाला होतो, असेही प्रविण तरडे यांनी सांगितले. त्या कंपन्यांचे फॅक्ट्री ले आउट फार चांगले आहे. मग त्यांच्या बाजूच्या कंपन्यांची अशी अवस्था का? ४० बाय ४० च्या खोलीत ३८ माणसे काम करतात का कधी? एवढ्याशा जागेत १० ते १२ केमिकल मशीन्स आणि ३८ माणसे कामाला. त्यातील जी २० माणसे वाचली त्यांचा आनंद मानायचा कि दुर्दैव असा प्रश्न प्रविण तरडे यांनी उपस्थित केला. प्रवीण तरडे यांनी काल कष्ट करून पोट भरणाऱ्या १८ निष्पाप जीवांचा काय दोष …? असा प्रश्न उपस्थित करीत या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली होती. यानंतर त्यांनी राग आणि शोक दोन्ही एकत्र व्यक्त करताना एक पोस्ट शेअर केली होती.

https://www.facebook.com/pravin.tarde.9/posts/4266598493361393

 

या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले कि, वेदना काय असतात ते आज कळलं…मुळशीतील सर्व राजकिय पक्ष , सर्व कामगार संघटना, सामाजिक संस्था, कंपनी व्यवस्थापन आणि स्वत: गावकऱ्यांनी एकत्र येऊन भविष्यातील असे अपघात टाळले पाहीजेत… कारण एमआयडीसी वाटेल असं कुठलच लक्षण प्रत्यक्ष गेल्यावर तिथं दिसलं नाही .. अरूंद रस्ते आणि छोट्या जागेत मोठ्या मशिन .. पाण्याचं लायसन्स असलेली कंपनी सॅनिटायझर बनवत होती.. कसं काय..? कोणी दिली परवानगी..? मित्रांनो माणसाच्या जीवासाठी एकत्रित लढलं पाहीजे .. १७ मृत कामगार भगिनींना योग्य न्याय देण्यासाठी माणूस म्हणुन झटलं पाहीजे .. नाहीतर अनेक घटनांसारखी ही घटना सुध्दा विसरून जावू .. आणि पुन्हा जागे होऊ नवीन अपघात झाल्यावर .. चला सर्वांनी एकत्र यायची वेळ आलीये आपल्या माणसांसाठी..