हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यात रस्ते अपघातांच्या प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. कारण, नुकतीच गोंदियामध्ये एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना मंगळवारी पहाटे देवरी शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावरील धोबीसराड गावाजवळ घडली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्यातील देवरी शहरालगत असलेल्या धोगीसराड गावाजवळ एका ट्रकमध्ये बिघाड झाल्यामुळे तो दुरुस्तीसाठी महामार्गाच्या पलीकडे थांबला होता. रात्रीच्या अंधारात ट्रकचा चालक दुरुस्तीचे काम करत होता. याचवेळी, रायपुरकडे जाणाऱ्या ट्रकने उभ्या असलेल्या या ट्रकला पाठीमागून जोरात धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की यामध्ये तिघांचा मृत्यू झाला. तसेच दोन्ही ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुढे अपघाताची माहिती मिळतात देवरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
यानंतर पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह देवरी येथील ग्रामीण रुग्नालयात शव विच्छेदनाकरीता पाठविले. मात्र अद्याप अपघातात मृत झालेल्यांची ओळख पटलेली नाही. त्यामुळे पोलीस याचा तपास करीत आहेत. दरम्यान, रात्रीच्या वेळी उभा असलेला ट्रॅक न दिसल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. सध्या या घटनेचा तपास देवरी पोलीस करीत आहेत.