सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात गुन्हेगारीची प्रमाण चांगलेच वाढले आहे. गेल्या 8 दिवसात साताऱ्यात तब्बल पाच वेळा कोयत्याने हल्ला करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. शुक्रवारी पुन्हा एकदा धारदार शस्त्राने एकावर हल्ला करण्यात आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यात शस्त्र व जमाव बंदी आदेश लागू केला. तर पोलिसांकडूनही अनुचित घटना घडू नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे. यादरम्यान आज कराड पोलिसांनी धडक कारवाई करत बेकायदेशीरपणे पिस्टल बाळगणाऱ्या व विक्री करण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीस अटक केली व त्याच्याकडून पिस्टल ताब्यात घेतले.
शंकर बदु जाधव (रा. वाघेश्वर, मसूर, ता. कराड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, कराडचे नवीन डीवायएसपी अमोल ठाकूर यांना कराड शहरातील हॉटेल कृष्णा पॅलेस परिसरात विनापरवाना पिस्टल विक्री करण्यासाठी एक इसम येणार असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार डीवायएसपी ठाकूर यांनी पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे एक पथक तयार केले. पोलीस पथकातीळ अधिकाऱ्यांनी तात्काळ दोन पंच तसेच कार्यालयातील इतर स्टाफसह हॉटेल कृष्णा पॅलेस कराड या ठिकाणी दोन टिम तयार करुन सापळा रचला.
संशयित इसम त्या ठिकाणी आला असता पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याची विचारपूस करत तपासणी केली. यावेळी पोलिसांना त्याच्या पॅन्टच्या कमरपट्टीस पाठीमागील बाजुस एक पिस्टल व त्याचे मॅग्झिनमध्ये एक जिवंत राऊंड आढळून आले. ताब्यात घेण्यात आलेल्या पिस्टलची किंमत सुमारे ५० हजार व जिवंत राऊंडची किंमत ३०० रुपये इतकी आहे. संबंधित शस्त्र पोलिसांच्या पथकाने तत्काळ ताब्यात घेतले. तसेच संबंधित आरोपी विरोधात कराड शहर पोलीस ठाण्यात भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३/२५ तसेच म.पो. का. कलम ३७ (१) (३) / १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. .
सदरची कारवाई ही उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आर. पी. पुजारी, सहाय्यक फौजदार अरुण दुबळे, पोलीस अंमलदार सागर बर्गे, असिफ जमादार, प्रविण पवार, सचिन साळुंखे, सुधीर जाधव यांचे पथकाने केलेली आहे. सदर कारवाईबाबत पोलीस अधीक्षक समीर शेख व उप पोलीस अधीक्षक बापु बांगर यांनी अमोल ठाकुर उपविभागीय पोलीस अधिकारी, कराड व कारवाई पथकातील अधिकारी अंमलदार यांचे कौतुक केले.