हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या कराड शहरात रात्रीच्यावेळी चोऱ्यांचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. शहरात बँका, शासकीय कार्यालये, महत्वाची कार्यालये तसेच सोन्या-चांदीच्या दुकानाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. तरीही चोरटे त्यांना काही जुमानत नाहीत ते बिनधास्तपणे चोरी करत आहेत. अशीच घटना नुकतीच कराड शहरातील बुधवार पेठ परिसरात घडली. या ठिकाणी रात्री जेवल्यानंतर फिरत असलेल्या एका आजीबाईचा चोरट्याने जेवलात का? असे विचारात त्यांच्या गळ्यातील चांदीची चैन घेऊन चोरट्याने धूम ठोकली. या घटनेमुळे महिला वर्गात मात्र, भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कराड शहरातील बुधवार पेठेत राहत असलेल्या अलका सुभाष कदम या आजी दररोजप्रमाणे रात्री नऊ ते दहा वाजण्याच्या सुमारास शतपावली करण्यासाठी कृष्णा नाका फुटपाथवरून निघाल्या होत्या. त्या भाग्यश्री प्रिंटिंग प्रेससमोर आल्या. यावेळी त्या एकट्या असल्याचे पाहून त्यांच्या पाठीमागून अज्ञात व्यक्ती आली. तिने पाठीमागून येऊन आजी जेवलात का? असा प्रश्न विचारला.
आजीबाई जेवलात का? विचारत गळ्यातील चैन हिसकावून चोरटा झाला पसार; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद pic.twitter.com/B3NxE4yoA4
— santosh gurav (@santosh29590931) June 9, 2023
आजी काही बोलणार इतक्यात व काही कळण्याच्या आत त्यांच्या गळ्यातील गंठण व चांदीची चेन हिसकावली. तसेच त्यांना गेटवर ढकलून दिले. व गळ्यातील चैन घेऊन चोरटा कृष्णा नाक्याच्या दिशेने निघून गेला. चोरट्याने त्यांना गेटवर ढकलल्याने त्या जखमी झाल्या. घरी आल्यानंतर त्यांनी हा प्रकार आपला मुलगा अतुल सुभाष कदम याला सांगितला. त्यांनी घडलेल्या घटनेची माहिती व सीसीटीव्ही फुटेज कराड शहर पोलीस ठाण्यात दिले. या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.