माणसाच्या लघवीवर चालणार ट्रॅक्टर; कसं ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंधन दरवाढीचा फटका सर्वानाच बसतोय. पेट्रोल डिझेलच्या सततच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य हैराण झाले आहेत. इंधन दरवाढीचा मोठा फटका शेतीमध्ये बसतोय. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढी मुळे शेतीच्या मशागतीचा खर्च वाढला आहे .त्याच पार्श्वभूमीवर याला पर्याय म्हणून आता अमेरिकेतील एका कंपनीने लघवीवर चालणारे ट्रॅक्टर तयार केले आहे. थोडं विचित्र वाटत असेल तरी हेच खरं आहे.

वास्तविक, अमेरिकन कंपनी अमोगीने अमोनियावर चालणारा ट्रॅक्टर तयार केला आहे. तसे पाहाता आपल्या मूत्रात अमोनिया मुबलक प्रमाणात आढळतो. म्हणजेच लघवी करूनही ट्रॅक्टर चालणे शक्य आहे. अमोगी या कंपनीने असा एक रिअ‍ॅक्टर तयार केला आहे, की जो अमोनियाचं विघटन करतो आणि त्यातल्या हायड्रोजनचा वापर करून त्यापासून ऊर्जानिर्मिती करतो. म्हणजेच की पेट्रोलऐवजी गाडीत लघवी टाकली की लगेच गाडी सुरु होणार नाही तर इंधन म्हणून लघवीचा वापर होण्यासाठी आधी त्यावर प्रक्रिया व्हावी लागेल.

दरम्यान, अनेक दशकांपासून उद्योगात अमोनियाचा वापर केला जात असल्याने, त्याच्या साठवणुकीसाठी आधीच पुरेशी व्यवस्था आहे. त्याच्या हाताळणी आणि वितरणासाठी साधने आधीच उपलब्ध आहेत. अमोनिया कार्बन डाय ऑक्साईड सोडत नसल्यामुळे कार्बनमुक्त वाहतुकीसाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो.