नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मध्यरात्री फेसबुक लाइव्ह करत हाताची नस कापून घेणाऱ्या एका व्यापाऱ्याला स्पेशल सेलच्या क्राइम ब्रँचच्या पोलिसांनी प्रयत्न करून वाचवले आहे. जर पोलिसांना तिकडे पोचायला थोडा आणखी उशीर झाला असता तर त्या व्यापाराचा जीव गेला असता. पण पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेऊन त्या व्यक्तीचा जीव वाचवला आहे. पोलिसांनी पीडित व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले आहे. त्याची प्रकृती आता स्थिर असल्याचे समजत आहे.
काय आहे प्रकरण
आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव हिरा असून तो मिठाईचा व्यापारी आहे. तो आपल्या दुकानात वेगवेगळ्या मिठाईचे पदार्थ बनवण्याचे काम करतो. पण मागच्या काही काळापासून हिरा तणावाखाली होता. याच तणावामधून हिराने गुरुवारी रात्री दीडच्या सुमारास फेसबुक लाइव्ह करत हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा व्हिडीओ पोलिसांनी पाहिल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून त्याचा जीव वाचवला आहे.
खरंतर, व्हिडीओ पाहिल्यानंतर, संबंधित व्यक्ती नेमकी कोण? आणि कुठे राहाते याची काहीही माहिती पोलिसांकडे नव्हती. पण त्याच्या फेसबुक प्रोफाइल आणि अन्य गोष्टीच्या माध्यमातून पोलिसांनी त्या व्यक्तीचा शोध घेतला. तेव्हा हि व्यक्ती पालम गावातील रहिवासी असल्याचे समजले. यानंतर पोलिसांनी तातडीने या घटनेची माहिती पालम गावातील स्थानिक पोलिसांना दिली. यानंतर या पोलिसांनी त्वरित या व्यक्तीच्या घरी जाऊन त्याला रुग्णालयात दाखल केले. पोलीस घटनास्थळी पोहोचेपर्यंत या व्यक्तीचे खूप रक्त वाहिले होते. जर पोलिसांना पोहचायला अजून उशीर झाला असता तर या व्यक्तीचा मृत्यू झाला असता. अशी माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. या व्यक्तीने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे अजून समजू शकले नाही. हिरा यांच्यावर एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार सुरु असून त्यांच्या जीविताचा धोखा टळला आहे अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.