कराड : तोतापुरी आंबे घेऊन निघालेल्या मालट्रकचा सोमवारी पहाटे पुणे बंगळूर महामार्गावर अपघात झाला. चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक कराड येथील कोल्हापूर नाका येथील उधाणपुलानजीक पलटी झाला. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच महामार्ग देखभाल विभागाचे पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी चालकासह एकास उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, सोमवारी पहाटे कर्नाटकहून मुंबईच्या दिशेने तोतापुरी आंबे घेऊन मालट्रक क्रमांक (केए ०२, एएच ५९६३) निघाला होता. ट्रक कराड येथील कोल्हापूर नाका येथे आला असता ट्रकवरील चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला. त्यानंतर ट्रक सुरक्षा रेलिंग तोडून पूलाच्या कठड्याला धडकून पलटी झाला. या अपघातानंतर महामार्गाच्या कडेला सर्वत्र आंबे पसरले होते. अपघात घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्याठिकाणी रस्त्याकडेला पडलेले आंबे घेऊन गेले. अपघातामध्ये ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
या अपघाताची माहिती मिळताच महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी दस्तगीर आगा, जितेंद्र भोसले, अमित पवार, कराड शहर पोलीस ठाण्याचे पोलिस कर्मचारी प्रशांत जाधव, दोन होमगार्ड यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देत ट्रॅकवरील चालकासह एका व्यक्तीस उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. या अपघाताची नोंद कराड पोलीस ठाण्यात करण्यात आलेली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.