हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्हयात किरकोळ कारणांवरून मारामारीच्या घटना घडत आहेत. त्यातून सातारा जिल्हा कारागृहही सुटलेला नाही. येथील कारागृहात असलेल्या बंदीवानांमध्ये टीव्ही पाहण्यावरुन बंदीवानांमध्ये तुफान हाणामारी झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा जिल्हा कारागृहात असलेल्या अभिजीत रामदास गोडसे (रा. करंजे), अक्षय पांडूरंग जगताप (रा. रविवार पेठ), साहिल रुस्तम शिकलगार (रा.नागठाणे सर्व ता.सातारा) केतन सुनील सावंत, राहूल शिवाजी क्षिरसागर (दोघे रा. लांडेवाडी ता. भोसरी, पुणे) यांच्यावर टीव्ही पाहण्याच्या कार्रवारून गुन्हा दाखल झाला आहे. दि. ३ रोजी सातारा जिल्हा कारागृहातील बरेक क्रमांक 2 मध्ये संबंधित बंदिवान टीव्ही पाहत बसले होते. यावेळी त्यांच्यात एकमेकांमध्ये सुरुवातीला शाब्दिक चकमक उडाली. यानंतर संशयितांनी हॉटपॉटचे भांडे तसेच लाथा बुक्क्यांनी एकमेकांना मारहाण करण्यास सुरुवात केले. या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ धाव घेत भांडणे सोडवली.
बंदीवानांची भांडणे सोडवल्यानंतर त्यांच्याविरोधात कारागृह पोलिस रंगनाथ सातव यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. यावरून संबंधितांना पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.