आईला वाढदिवसाला साडी द्यायची म्हणून लेकानं ठरवलं, घराबाहेर पडल्यानंतर घडलं असं काही…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात एक ह्रदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. आपल्या आईचा वाढदिवस असल्याने तिला वाढदिवसानिमित्त साडी घ्यायची इच्छा व्यक्त केलेल्या मुलाचा ट्रॅक्टरच्या चाकांखाली पडून मृत्यू झाला आहे. हि दुर्दैवी घटना भोसे (ता. कोरेगाव) येथे घडली असून सुहास विश्वास माने (वय 40) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, कोरेगाव तालुक्यातील भोसे गावातील युवक सुहास माने यांनी आपला ट्रॅक्टर सुरू करताना लवकर सुरू होत नाही म्हणून आपल्या परड्यातील उताराच्या जागी चाकांना दगड लावून पार्क केला होता. रविवारी सकाळी सुहास माने हे ट्रॅक्टर बाहेर काढण्यासाठी परड्यात गेले. त्या ठिकाणी सुरुवातीला त्यांनी ट्रॅक्टरमागे औजारे जोडली. त्यानंतर ट्रॅक्टरच्या मध्यभागी उभे राहून चाकाखालील दगड काढून उभ्याने ट्रॅक्टर सुरू केला. तसेच उडी मारून ट्रॅक्टर चालकाचा आसनावर बसताना अचानक तोल जाऊन ते ट्रॅक्टरच्या चाकाखाली पडले आणि चाक त्यांच्यावर अंगावर जाऊन अडकले.

यावेळी त्या ठिकाणी कोणीच नसल्याने ते ट्रॅक्टरच्या चाकाखाली गंभीर जखमी अवस्थेमध्ये अडकून पडले व अखेर त्यांच्यावर जागीच मृत्यूने झडप घातली. बराच वेळ ट्रॅक्टर सुरू असल्याचा आवाज कसा येतोय? हे पाहण्यासाठी शेजारील एक महिला घटनास्थळी गेली असता ते दृश्य पाहून त्यांनी इतर लोकांना याबाबत माहिती दिली. या घटनेची नोंद येथील कोरेगाव पोलिसात झाली असून, अधिक तपास सुरू आहे.

आईला वाढदिवसाची साडी देण्याची इच्छा राहिली अधुरी

भोसे गावातील युवक सुहास माने यांच्या पाठीमागे आई, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. आईचा वाढदिवस असल्याने घटनेपूर्वी सुहास यांनी आईचा मोबाईलवर फोटो काढून मोबाईलच्या स्टेटसला ठेवला होता. आईला नवीन साडी घेऊन येऊन आईचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्याची इच्छा व्यक्त करून ते बाहेर पडले होते. मात्र, घरातून बाहेर पडल्यानंतर काही मिनिटांत त्यांच्यावर काळाने घाला घातल्याने ग्रामस्थांत हळहळ व्यक्त होत आहे.