हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील म्हसवड जवळ मंगळवारी दि. २६ रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघाताची घटना घडली. येथील मायणी चौकात भरधाव वेगाने आलेल्या डंपरने दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की यामध्ये दुचाकीवरील युवक जागीच ठार झाला तर युवती गंभीर जखमी झाली. अपघातातील जखमी युवतीचे दोन्ही पाय तुटले तसेच तिला खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अभिषेक जाधव (वय ३०, रा. सातारा असे मृत युवकाचे नाव आहे. तर नेहा जयवंत सावंत (वय २७, रा. सातारा) असे जखमी युवतीचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, म्हसवड येथील सातारा-पंढरपूर महामार्गावर मायणी चौकात दुचाकी क्रमांक (एम एच ५० एफ ५७५५) होन्डा कंपनीची युनिकॉर्न दुचाकी वरून अभिषेक जाधव व नेहा जयवंत सावंत दोघेजण निघाले होते. यावेळी पाठीमागुन डंपरने दिलेल्या धडकेत अभिषेकचा जागीच मृत्यु झाला आहे, तर त्याच्या पाठीमागे बसलेल्या नेहाचे दोन्ही पाय तुटले.
अपघातातील माहिती मिळताच म्हसवड पोलीस स्टेशनचे अधिकारी राजकुमार भुजबळ यांनी अपघातस्थळी धाव घेत जखमी असलेल्या युवतीला शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले. सदर अपघात इतका भिषण होता की अपघातातील मृत युवकाच्या डोक्याचा अक्षरशा चेंदामेंदा झाल्याच्या दृष्याने अनेकांचे डोळे पानावले. नंबरप्लेट नसलेला व मुरुम भरलेला डंपर म्हसवड हुन दहिवडीकडे जात असताना मायणी चौकात अचानक डंपरने मायणीकडे जाण्यासाठी वळण घेतले. त्यामुळे दुचाकीला जोराची धडक बसली.
https://twitter.com/HelloMaharashtr/status/1706757330677969171?t=PTjTGVh_r6LUgsRGknPiKw&s=19
यामध्ये अभिषेक जाधव याच्या डोक्यावरून व नेहा सावंत हिच्या दोन्ही पायावरून डंपर गेला. यामध्ये जाधव याचा जागीच मृत्यू झाला तर नेहा सावंत ही गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडली. तिला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताचा पुढील तपास म्हसवड पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ करीत आहेत.