Satara News : बोलत नाही म्हणून रागाच्या भरात तरुणीला उचलून पायरीवर आपटलं

Shahupuri Police Station News
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेक्कदा रागाच्या भरात काहीजण कृत्य करून बसतात. नंतर त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागतो. अशीच एक घटना सातारा शहरात घडली आहे. बोलत नाही याचा राग मनात धरून एका तरुणाने कापड दुकानात मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या तरुणीला उचलून पायरीवर आपटले आहे. त्यानंतर कपाळावर लोखंडी राॅड मारून तिच्या खुनाचा प्रयत्न केला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात तिघांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संदेश तुकाराम गिरमे (वय 27, रा. कूस, ता. सातारा) व संकेत आणि धनाजी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, पीडित तरुणी 23 वर्षांची असून, ती सातारा शहरातील एका कपड्याच्या दुकानामध्ये मॅनेजर म्हणून काम करत आहे. ही तरुणी आणि तिचा मित्र दि. 16 रोजी रात्री साडेदहा वाजता एका अपार्टमेंटच्या तळ मजल्यामध्ये बोलत थांबले होते. त्यावेळी त्या ठिकाणी संदेश गिरमे हा त्याच्या अन्य दोन मित्रांसमवेत आला. पीडित तरुणीने त्याच्यासोबत बोलणे बंद केले होते.

याचा राग मनात धरून त्याने काही एक न बोलता अचानकपणे तरुणीला पकडून जोराने बाजूला ढकलले. त्यानंतर त्याने पीडितेच्या कानाखाली आणि नाकावर बुक्की मारली. यामुळे तिच्या नाकातून जखम होऊन रक्त येऊ लागले. त्यानंतर संदेश गिरमे याने तरुणीच्या छातीवर लाथा मारून तिला उचलून पायरीवर आपटले. ‘तुला आता जिवे मारूनच टाकतो,’ असे म्हणत जवळ पडलेला लोखंडी राॅड तिच्या कपाळावर आणि डोक्यात पाठीमागून मारला. यामध्ये पीडित तरुणी गंभीर जखमी झाली. हा वाद सोडविण्यास मध्यस्थी झालेल्या पीडित तरुणीच्या मित्रालाही तिघांनी बेदम मारहाण केली.

जखमी तरुणीला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिची प्रकृती सुधारल्यानंतर तिने सोमवारी रात्री 11.45 वाजता शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी संदेश गिरमे याच्यासह त्याच्या दोन मित्रांवर खुनाचा प्रयत्न करणे तसेच विनयभंग, संगनमत करून मारहाण करणे आदी कलमांन्वये गुन्हा दाखल केला. पोलिस उपनिरीक्षक बशीर मुल्ला हे अधिक तपास करीत आहेत.