खंडाळा | पुणे- बंगळूर महामार्गावर पुण्याला जाण्यासाठी गाडीची वाट पाहत उभे राहणे जिवावर बेतले आहे. महामार्गावरून भरधाव निघालेल्या टेम्पोच्या टायरची धडक युवकाला बसल्याने मृत्यू झाला. सोमवारी सकाळी शिरवळ येथील महामार्गावरील थांब्यावर ही घटना घडली. प्रेम महेंद्र ढमाळ (वय- 21 रा. असवली, ता. खंडाळा) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, पुणे येथे शिक्षणासाठी निघालेला प्रेम हा मित्रासोबत महामार्ग स्टॉपवर गाडीची वाट पहात थांबला होता. याचवेळी पुण्याकडे भरधाव वेगात आयशर टेम्पो (क्रमांक एम. एच. 11 ए. एल- 1701) निघाला होता. याचवेळी स्टॉपवर टेम्पो आला असता वेगामध्येच टेम्पोची दोन्ही चाके निघून प्रेम ढमाळ याच्या अंगावर आली. यामध्ये टायरच्या धडकेत तो रक्तबंबाळ झाला. गंभीर जखमी प्रेम याला उपचारासाठी खासगी दवाखान्यात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
या अपघाताला टेम्पो चालक मधुकर जाधव (रा. भक्तवडी, ता. कोरेगाव) हा जबाबदार असल्याने त्याच्यावर शिरवळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी प्रथमेश आबा काळे यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मधुकर जाधव याला ताब्यात घेतले आहे. या अपघातामुळे महामार्गावरील थांब्यावर गाडीची वाट पहाणे जिवावर बेतले आहे. या ठिकाणी वारंवार अपघात होत असल्याचे समोर आल्याने प्रवाशांनी काळजी घेणे गरजेचे असून या थांब्यावर थांबू नये, असे पोलिसांनी आवाहन केले आहे.