हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सामान्य माणसांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने स्वराज्य यात्रेची संकल्पना राबविण्यात आली आहे. त्या अनुषंगाने आदमी पार्टीच्या वतीने पंढरपूर ते रायगड अशी स्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा सातार्यात 1 जून रोजी येणार आहे, अशी माहिती आम आदमी पार्टीचे सरदार सागर भोगांवकर व सातारा जिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सातारा जिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव यांनी सातारा येथे नुकताच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष रतन पाटील, सचिव मारुती जानकर, शहराध्यक्ष जयराज मोरे, कायदा विभागाचे सचिव मंगेश महामुलकर आदी उपस्थित होते.
यावेळी भोगांवकर म्हणाले, आम आदमी पार्टीच्या वतीने 28 मे ते 6 जून स्वराज्य यात्रा पंढरपूर ते रायगड अशी काढण्यात आली असून ती महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यातून जाणार आहे. यामध्ये पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, मुंबई, रायगड या जिल्ह्यांचा समावेश आहे. ही यात्रा एकूण 10 दिवस चालणार असून 782 किलोमीटरचा प्रवास होणार आहे.
आगामी निवडणुकांच्या दृष्टीने जनाधार तयार करणे, लोकांना भेडसावणार्या समस्यांना वाचा फोडणे, सध्याच्या काळातील सत्तेमधील वतनदारांना हटवून सर्वसामान्यांचे राज्य प्रस्थापित करणे ही आम आदमी पार्टीची उद्दिष्टे आहे. त्या उद्दिष्टांच्या प्रसारासाठी ही यात्रा काढली जात आहे. आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र प्रभारी गोपाल इटालिया, रंगा राचुरे, धनंजय शिंदे, विजय कुंभार, अजिंक्य शिंदे, संदीप देसाई यात्रेत सहभागी होणार आहेत.
सातारा शहरात ही यात्रा 1 जून रोजी सायंकाळी 5 वाजता बॉम्बे रेस्टॉरंट चौक येथून शहरात येणार आहे. या यात्रेचे स्वागत होऊन सातार्यात आम आदमी पार्टीच्या वतीने रॅली काढण्यात येणार आहे. शाहू चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे आम आदमी पार्टीच्या वतीने जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.