विशेष प्रतिनिधी । दिल्लीत सत्ता गाजवणाऱ्या आम आदमी पक्षाला राज्यात अजूनही अस्तित्व तयार करता आले नाही आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठी निराशा हाती आली आहे. दिल्लीची सत्ता असणाऱ्या आपला राज्यात केवळ ०.१ टक्के मते मिळाली आहेत. विशेष म्हणजे राज्यात नोटाला १.३५ टक्के मिळाली आहेत.
विधानसभेच्या २८८ पैकी आपने २० जागांवर उमेदवार उभे केले होते. पण यावेळीच्या निकालाने आपला राज्यातील वाटचाल अधिक अडचणीची जाणार असल्याचे दिसत आहे.दिल्लीचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी प्रचाराच्या अंतिम टप्प्यात विदर्भात सभा घेतली होती. केजरीवाल यांनी पक्षाच्या उमेदवार परोमिता गोस्वामी यांच्यासाठी सभा घेतली होती.
पण त्यांना केवळ ३ हजार ५९६ मते मिळाली. याउटल ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातील आपचे उमेदवार अबू फैजी यांनी चांगली कामगिरी केली. फैजी यांना ३० हजार मते मिळाली ही संख्या एकूण मतांच्या १७.०५ टक्के इतकी आहे. फैजी यांच्या प्रचारासाठी दिल्लीतील काही नेते देखील आले होते. या मतदारसंघात फैजी यांच्या समोर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांचे आव्हान होते.