हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांना राज्यसभेतून निलंबित करण्यात आले आहे. खासदारांच्या खोट्या सह्या केल्याप्रकरणी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. खासदार राघव चढ्ढा यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्याची मागणी राज्यसभेच्या ५ खासदारांनी केली होती. त्यामुळे आता राघव चढ्ढा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणात योग्य ती चौकशी करण्यात येईल असे आश्वासन राज्यसभेच्या उपसभापतींनी खासदारांना दिले आहे.
या पाच खासदारांनी धावा केला आहे की, दिल्ली सेवा विधेयक त्यांच्या संमतीशिवाय निवड समितीकडे पाठवण्याच्या प्रस्तावावर त्यांच्या नावाचा उल्लेख त्यांना कोणतेही कल्पना न देता करण्यात आला होता. हा प्रस्ताव राघव चढ्ढा यांनी मांडला होता. या प्रकरणात चौकशी करण्यात यावी अशी मागणी अमित शहा यांच्याकडून करण्यात आली होती. यामध्ये भाजपचे तीन खासदार, बीजेडी एक, एआयएडीएमकेचे एक खासदार यांचा समावेश आहे. या सर्वांनी राघव चढ्ढा यांनी केलेल्या कृतीवर निषेध नोंदविला आहे.
मुख्य म्हणजे, राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांनी आपल्यावर लावलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यामुळे आपली प्रतिमा खराब करणाऱ्या भाजपच्या डावपेचांचा मी पर्दाफाश करणार असल्याचं राघव चढ्ढा यांनी म्हणले आहे. राघव चढ्ढा यांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडणाऱ्या खासदारांमध्ये सस्मित पात्रा (BJD), नरहरी अमीन (BJP), सुधांशू त्रिवेदी (BJP), नागालँडचे खासदार फांगनॉन कोन्याक (BJP) आणि लोकसभेचे माजी उपसभापती थंबीदुराई यांचा समावेश आहे.
राघव चढ्ढा यांच्यासोबत आपचे दुसरे खासदार संजय सिंह यांचे देखील दुसऱ्या एका प्रकरणात निलंबन वाढविण्यात आले आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना पियुष गोयल यांनी म्हटले आहे की, संजय सिंह ज्या पद्धतीने वागले तेही अत्यंत निषेधार्ह आहे. निलंबनानंतरही ते सभागृहात बसून राहिले. त्यामुळे सभागृहाचे कामकाजही तहकूब करावे लागले. संजय सिंह आतापर्यंत 56 वेळा वेलमध्ये आले आहेत. यावरून त्यांना सभागृहाचे कामकाज विस्कळीत करायचे असल्याचे स्पष्ट दिसते.