भाजपच्या 400 पारच्या नाऱ्याची पार हवा निघून गेलीय??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अबकी बार 400 पार (Ab Ki Bar 400 Par) … टीव्ही वरच्या जाहिरातीतून ते रस्त्यावरच्या फ्लेक्स पर्यंत… टी शर्ट पासून ते चौकाचौकात फिरणाऱ्या डिजिटल स्क्रीनवर याच भाजपच्या चारशे पार जाहिरातीचा बोलबाला दिसला… नरेंद्र मोदींचा फोटो लावून भाजपने ही टॅगलाईन अशी काही लोकांपर्यंत पोहचवली की लोकसभेला फक्त आणि फक्त मोदींचाच करिष्मा चालेल असं वाटतं होतं. पण लोकसभा निवडणुकीचा पहिला, दुसरा असं करत करत आता मतदान पाचव्या टप्प्यावर येऊन पोहचलंय. आणि भाजपच्या या चारशे पार घोषणेचा मोये मोये झालाय अशी चर्चा आहे… प्रत्यक्ष ग्राउंडवर मोदींचा कुठलाच करिश्मा नसून उलट मोदी सरकारच्या विरोधात मतदार जाहीर संताप व्यक्त करतायत…महाराष्ट्रातील वातावरण पाहता भाजपची गाडी 200 प्लस तरी जाईल का? अशीही शंका घेतली जातेय… पण मोठ्या आत्मविश्वासाने लोकसभा निवडणुकीत उतरलेल्या भाजपचा ऐन निवडणुकीच्या मध्यात भाजपचा गेम का झालाय? 400 पार हे भाजपने पाहिलेलं स्वप्न हे खरच सत्यात उतरण्यासारखं होतं. की मतदान फिरवण्यासाठी भाजपने सोडलेलं हे पिल्लू होतं? तेच सविस्तर पाहुयात

गेल्या दहा वर्षांत सत्ताधारी भाजपच्या अनेक घोषणा गाजल्या. इतक्या की या काळात विरोधकांनी कोणत्या घोषणा दिल्या हे सहज आठवतही नाही. ‘अच्छे दिन आने वाले हैं’, ‘अब की बार मोदी सरकार’, ‘फिर एक बार मोदी सरकार’, ‘मोदी हैं तो मुमकिन हैं’… भाजप म्हणजे मोदी आणि मोदी म्हणजे भाजप असं चित्र प्रत्येक घोषणेतून निर्माण केलं गेलं…यावेळी ‘मोदी की गॅरंटी’चा वादा करत भाजपने ‘अब की बार ४०० पार’ची घोषणा दिली. निवडणुका सुरू होण्यापूर्वी आणि पहिल्या टप्प्यातलं मतदान पार पडेपर्यंत ती दणाणली आणि नंतर मात्र तिचा फुसका बार निघाला… इतका की विकसित भारतासाठी… चारशे पार, तिसऱ्या क्रमांकाच्या अर्थव्यवस्थेसाठी… चारशे पार, गरिबांच्या प्रगतीसाठी… चारशे पार, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी… चारशे पार’ असं सभांमध्ये पब्लिकला म्हणायला भाग पाडणाऱ्या मोदींनी ही घोषणाच आपल्या भाषणातून डिलिट केली…

चौथा टप्पा पार पडला, भाजपच्या 400 पारच्या नाऱ्याची पार हवा निघून गेलीय

पण या घोषणेचा मोये मोये कुठून सुरू झाला? याची नीट शोधाशोध केली तर याची सुरुवात केली कर्नाटकचे भाजपचे खासदार अनंत कुमार हेगडे यांच्या एका विधानानं! भाजपला ४००हून अधिक जागा हव्या आहेत कारण दोन तृतीयांश सदस्य असतील तर संविधानात सुधारणा करता येतात, असं बोलून त्यांनी विरोधकांच्या हातात आयात कोलीत दिलं. विरोधकांनी ही भारतातील शेवटची निवडणूक असून मोदी यापुढे हुकूमशहा असतील असा प्रचार सुरू केला. ही मेख परफेक्ट बसली आणि मोदी संविधान बदलण्यासाठी अशी घोषणा देतायत, हे विरोधकांनी सेट केलेलं नरेटिव्ह कामाला आलं. भाजपला ऐन निवडणुकीच्या तोंडावर दलित, बहुजन, अल्पसंख्याक आणि मुस्लिम व्होट बँक विरोधात जाण्याची भीती या घोषणेने बसली…वेळीच सावध होतं भाजपने हे कँपेन गुंडाळलं…पण याचा आणखीन उलटा बाउन्सर पडला. भाजपला पराभव दिसू लागला आहे, म्हणून त्यांनी घोषणा गुंडाळून ठेवल्याच दर सभेत बिंबवलं जाऊ लागलं. एरवी प्रचारतंत्रात भाजपचा हात कोणी धरू शकत नाही, मात्र इथे भाजपची विरोधकांनी पुरती पाचर बसवली. राहुल गांधी, कन्हैया कुमार, शरद पवार सोबतच आम आदमी पार्टी यासारख्या सर्वच विरोधी पक्षातील नेत्यांनी भाजपच्या या 400 पारला आपल्या तिखट शब्दांनी चांगलंच घायाळ केलं. आम आदमी पार्टीचे संजय सिंग यांनी तर इतिहास सांगून नरेंद्र मोदी यांच्या दाव्याची पुरती हवा काढून टाकली.. मोदीजी फर्जी नारा देण्यात मास्टर आहेत. बंगालमध्ये गेले आणि म्हणाले २०० पार आल्या ७७ सीट, दिल्लीत म्हणाले ४५ पार आल्या ८ सीट, हरियाणात म्हणाले ७५ पार आल्या ४० सीट, महाराष्ट्र म्हणाले १५० पार आल्या १०५ सीट, मिझोरममध्ये म्हणाले २१ पार आली १ सीट. आता म्हणतायत ४०० पार ४०० पार महाराष्ट्रातली जनता म्हणतेय तडीपार, तडीपार…’ महाराष्ट्रात तर दोन पक्षातील मोठे गट फोडूनही भाजपला एका एका जागेसाठी करावी लागणारी धडपड पाहता चारशे सोडून देऊ भाजप 200 पार कसा जाणार? असा प्रश्न लोक विचारू लागलेत…

आणखीन एक गोष्ट वारंवार बोलली जातेय ती म्हणजे 400 पारचं इंडिया शायनिंग होणार का?

तर आधी समजून घेऊ इंडिया शायनिंग नेमकं होतं काय? 2004 ला पुन्हा एकदा अटलबिहारी वाजपेयी सरकारने सत्तेत येणासाठी इंडिया शायनिंगचा नारा दिला. मूळात इंडिया शायनिंग हे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या प्रतिमा संवर्धनासाठी तयार करण्यात आलेलं घोषवाक्य होतं. पुढे ते सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचारात सातत्याने वाजविण्यात आलं. टॅम मीडिया रिसर्च या टीव्ही मॉनिटरिंग एजन्सीने सादर केलेल्या आकडेवारीनुसार ही जाहिरात टीव्हीवर तब्बल नऊ हजार ४७२ वेळा दाखवण्यात आली. पोलिओ लसीकरणाच्या मोहिमेनंतरची ही सर्वांत मोठी प्रचारमोहीम ठरल्याचंही या एजन्सीने म्हटलं होतं. याव्यतिरिक्त रेडिओ, वृत्तपत्रादी माध्यमांतही इंडिया शायनिंग प्रामुख्याने झळकवण्यात आलं होतं…निवडणुकांची औपचारिक घोषणा झालेली नव्हती त्या काळात ही मोहीम राबविली गेली. तत्कालीन मुख्य निवडणुक आयुक्त टी. एस. कृष्णमूर्ती यांनी या संदर्भात सरकारला इशाराही दिला होता. करदात्यांचे पैसे सत्ताधारी पक्षाची जाहिरात करण्यासाठी वापरणं योग्य नसल्याचं त्यांनी निदर्शनास आणून दिलं होतं. सरकारने आचारसंहिता लागू होताच या जाहिराती बंद करण्यात येतील, असं उत्तर दिलं. त्यानुसार त्या बंद करण्यात आल्याही. मात्र निवडणुकांदरम्यान सातत्याने इंडिया शायनिंचा पुनरुच्चार केला गेला. घोषणा दिल्या गेल्या. देशात मूलभूत समस्या कायम असताना एनडीएच्या काळात प्रचंड विकास झाल्याचे दावे या जाहिरातींत करण्यात आले होते… त्यामुळे सगळ्यांनाच पुन्हा एकदा वाजपेयी सरकार आरामात निवडून येईल, असं वाटतं होतं. पण निकाल लागला आणि भाजपला सर्वात मोठा फटका बसून काँग्रेस सरकार सत्तेत आली… थोडक्यात भाजपची ही इंडिया शायनिंगची घोषणा गंडली होती. आता पुन्हा एकदा याचाच रिपीट टेलिकास्ट अबकी बार 400 पार च्या रूपाने होईल, असं काही राजकीय विश्लेषकांचे मतं आहे…

बॉटम लाईन काय तर 20 मे ला लोकसभेचा पाचवा टप्पा पार पडेल. आणि 4 जूनला लोकसभेचा निकालही लागेल. त्यामुळे 400 पारला भाजपनं सत्यात उतरलंय की या घोषणेचा मोये मोये झालाय? हे काही दिवसातच स्पष्ट होईल..बाकी तुम्हाला भाजपच्या या घोषणेबद्गल काय वाटतं? तुमची मतं, प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.