औरंगाबाद | एका बिल्डरला आयकर अधिकारी असल्याचे सांगून तीन जणांनी 60 लाख रुपयांची खंडणी मागितली. बिल्डरला संशय आल्याने या सर्व व्यवहाराचा व्हिडिओ बनविला व पोलीस आयुक्तांकडे या प्रकरणी तक्रार करण्यात आली आहे. सुशांत दत्तात्रय गिरी असे तक्रारदार बिल्डरचे नाव आहे.
या प्रकरणी अधिक माहिती अशी की, गिरी हे व्यवसायाने बिल्डर आहेत. त्यांच्याच ओळखीच्या एका व्यक्तीने 100 कोटी रुपयांच्या व्यवहार संबंधी कर बुडविला अशी थाप मारत गिरी यांच्याकडे 60 लाख रुपये खंडणी मागितली. तडजोड करण्यासाठी दोन व्यक्ती भेटले. त्यातील एकजण आयकर अधिकारी म्हणून आला होता तर दुसरा त्या अधिकाराचा साह्ययक म्हणून आला होता. या व्यक्ती वर संशय आल्याने ही सर्व घटना मोबाईल मध्ये कैद करण्यात आली. तडजोडी साठी आलेले दोघेही त्यावेळी तिसऱ्या व्यक्तीला फोन लावून तडजोड करीत होते. शेवटी 45 लाखात तडजोड ठरली. ही सर्व घटना चित्रित झाल्यानंतर गिरी यांनी थेट पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी भेट घेऊन या विषयी तक्रार दिली.
या घटने प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गिरी यांच्या वतीने तक्रार देण्यात आली आहे. ही तक्रार प्राप्त झाली असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. वरिष्ठांच्या आदेशाने पुढील कायदेशीर प्रक्रिया केली जाईल अशी माहिती जवाहर नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक संतोष पाटील यांनी दिली.