पंढरपूरातून अपहरण, आंबोली घाटात दोघांचा मृतदेह : कराडात दहा दिवस मुक्काम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड | आर्थिक देवघेवीच्या वादातून पंढरपूरातून अपहरण केलेल्या एकाला कराडात एका घरात दहा दिवस ठेवले. नंतर दारूच्या नशेत मारहाणीत एकाचा मृत्यू झाला अन् त्याचा मृतदेह टाकताना आरोपीचाही पाय घसरून दरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात तिसऱ्या साथीदाराने हा सर्व प्रकार सांगितला आहे. दोन्ही मृतदेह आंबोली घाटातून बाहेर काढण्यात आले असून अधिक तपास सिंधुदुर्ग पोलिस करीत आहे. भाऊसो अरूण माने (वय- 34, रा. कराड) व सुशांत आप्पासो खिल्लारे (रा. पंढरपूर, जि. सोलापूर) या दोघांचा मृत्यू झाला आहे. तर साथीदार तुषार शिवाजी पवार (वय- 30, रा. शिवाजी स्टेडियम, कराड) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी : पंढरपूर येथील सुशांत खिल्लारेचे अपहरण करून त्याला कराडच्या एका राहत्या घरात ठेवण्यात आले. सुशांत यांचा खून केल्याने पुरावा नष्ट करण्यासाठी खिल्लारेच्या मृतदेह आंबोली घाटातील दरीत टाकताना खुनातील संशयित भाऊसो माने याचा तोल जाऊन तोही घाटाच्या दरीत कोसळला. त्यातच त्याचाही मृत्यू झाला. त्याची कबुली या प्रकरणी ताब्यात घेतलेल्या दुसरा संशयित तुषार पवार याने पोलिसांना दिली. त्यानुसार संशयित पवारला ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. सदरचा सर्व प्रकार आर्थिक देवघेवीच्या वादातून झाली आहे.

संशयित तुषार पवार व भाऊसाहेब माने हे दोघे मित्र आहेत. त्यांनी नवीन वीटभट्टीचा व्यवसाय सुरू केला आहे. त्या ठिकाणी कामगार हवे असल्यामुळे पंढरपूर येथे मुकादम म्हणून काम करणाऱ्या सुशांत खिल्लारे यांच्याकडून माने याने वीटभट्टीवर काम करण्यासाठी कामगार मागविले होते. त्यासाठी त्याला तीन लाख रुपये देण्यात आले होते; परंतु पैसे घेतल्यानंतर खिल्लारे याने कामगार दिले नाहीत. पैसे परत करण्यास नकार दिल्यामुळे पैसे वसुलीसाठी तुषार पवार व भाऊसो माने यांनी कट रचला. त्यांनी 19 जानेवारीला खिल्लारे याचे पंढरपूर येथून अपहरण केले. त्याला गोड बोलून निर्जनस्थळी बोलविले. तेथून अपहरण करून कराडला आणले. त्याला माने याने आपल्याच घरात कराड येथे दहा दिवस नजर कैदेत ठेवले. त्यांनी रविवारी (दि. 29) खिल्लारेला दारू पिण्यास घरासमोर असलेल्या शेतात नेले. त्या वेळी विचारणा करताना तिघांत वाद झाले. या वेळी दोघांनीही त्याला जोरदार मारहाण केली. त्यात खिल्लारेचा मृत्यू झाला असावा असा संशय आहे. अचानक खिल्लारे मृत्युमुखी पडल्याने दोघे जण घाबरले. त्या वेळी पवारने माझ्या मोटारीतून मृतदेह आंबोली घाटात नेऊन टाकू, असे सांगितले. त्यानुसार (दि. 30) दोघे जण आंबोलीच्या दिशेने आले. त्यानंतर काल सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास प्लॅस्टिक पिशवीत असलेला मृतदेह दरीत टाकत असताना माने याचा पाय निसटला व तो मृतदेहासह खोल दरीत कोसळला.

अचानक प्रकार झाल्यानंतर सुशांत पवार घाबरला. रात्रभर तो तिथेच गाडीत बसून राहिला. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास कराड येथील आपल्या मित्राला झालेली सर्व हकिकत सांगितली. त्यामुळे तुम्ही या, असे पवारने मोबाईलवरून सांगितले. मित्राने प्रकार गंभीर असल्याने खिल्लारे व माने यांच्या घरातील लोकांना कल्पना दिली. त्यानंतर माने याच्या कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. त्यामुळे सर्व प्रकार उघड झाला.