हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज शिवसेनेचे बंडखोर आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नागरी सत्कार सिल्लोड – औरंगाबाद येथे करण्यात आला. या कार्यक्रमात सत्तार यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक करताना उध्दव ठाकरे यांच्या गटाला आव्हान दिले. “आपली शिवसेनाच ओरिजनल आहे. कोणताही नवीन बाण समोर आला तर एकनाथ शिंदेंच्या धनुष्यबाणापुढे कुणाचाच बाण टिकणार नाही, हे गॅरंटीने सांगतो,” असे सत्तार यांनी म्हंटले आहे.
सिल्लोड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सत्कार कार्यक्रमावेळी अब्दुल सत्तार यांनी जोरदार भाषण केले. ते म्हणाले की, “मी राजकारणात संघर्ष आणि राजकारण करून आलो आहे. सुरतला गेलो तेव्हा पन्नास आमदार सोबत होते. नंतर त्यातील 49 आमदार घरी परतले. मात्र, मी एक एकमेव आमदार असा आहे कि एकटा मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत होतो.”
एकनाथ शिंदेच्या भेटीचा रात्री 2 वाजताचा ‘तो’ किस्सा
यावेळी आ. अब्दुल सत्तार यांनी एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना त्यांच्यासोबत रात्री दोन वाजता झालेल्या भेटीबाबतचा एक किस्सा सांगितला. यावेळी आ. सत्तार म्हणाले की, “एका कामासंदर्भात माझ्या फाईलवर एकनाथ शिंदे साहेबांची सही करायची राहिली होती. तेव्हा मला सेक्रेटरी म्हणाले कि, तुम्ही शिंदे साहेबांकडून लिहून आणा. त्यावेळी मी रात्रीच्या दोन वाजता शिंदे साहेबांच्या घरी गेलो. तेव्हा ते जिन्याची पायरी चढत होते. तेव्हा त्यांनी फक्त माझा चेहरा पाहिला. मला विचारले, “काय राहिलं अब्दुल भाई म्हणत मला जवळ बोलावले आणि रात्रीच्या दोन वाजता नगरपालिकेला 20 कोटी रुपये आणि जागा मंजूर करून दिली,”असा किस्सा सत्तार यांनी यावेळी सांगितला.