उत्पन्न वाढविण्याचे अनेक चांगले मार्ग आहेत, दारूबंदीशी तडजोड नको – डॉ. अभय बंग यांचं अजित पवारांना आवाहन

चंद्रपूरमधील दारूबंदी हटवण्याची चर्चा समोर येत असताना मुक्तीपथ आणि सर्च या संस्थेचे संचालक अभय बंग यांनी अजित पवारांना आवाहन करणारा पत्रवजा मजकूर लिहला आहे.

चंद्रपूरमध्ये २०१५ साली लागू झालेली दारूबंदी हटविण्याची चर्चा सुरू असल्याची बातमी समोर येत आहे. मला ही बातमी अविश्वसनीय वाटते. कारण चंद्रपूर जिल्ह्याच्या दारूबंदीसाठी जेव्हा डॉ. राणी बंग श्री. अजित पवार यांना भेटल्या तेव्हा त्यांनी चंद्रपूरच्या दारूबंदीला पाठिंबा व्यक्त केला होता. पूर्वीच्या शासनाचे चांगले निर्णय रद्द न करता उलट ती अपूर्ण कामे या शासनाने पूर्ण करावी. एकीकडे कर्जमाफी, शिवभोजन अशी चांगली कामे त्याच लोकांना दारू पाजल्याने निरर्थक होतील. सरकारने उत्पन्न चांगल्या मार्गाने वाढवावे. दारूमुळे रस्ते अपघात होतात.

दारुमुळे सिरोसिस व कॅन्सर सारखे रोग होतात. त्यामुळे दारूपासून मिळणारा पापाचा कर कोणत्याही शासनाने वाढवू नये. दारूमुळे अवैध दारू वाढली हा शब्दच्छल आहे. कारण दारूबंदीनंतर सर्वच दारू अवैध ठरते. वस्तुतः बंदीमुळे दारू कमी होते. चंद्रपूरमध्ये दारूबंदी लागू होण्यापूर्वी आम्ही जिल्ह्याचे नमूना सर्वेक्षण केले. त्यावेळी कायदेशीर, बेकायदेशीर अशी दोन्ही प्रकारे १९२ कोटी रुपयांची दारू खपत होती. दारूबंदी नंतर १ वर्षाने केलेल्या सर्वेक्षणात ९० कोटी रुपयांची दारू कमी झाली. उरलेली दारू कशी कमी करायची हा पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाचा प्रशासकीय प्रश्न आहे.

तिथे पूर्वीचे शासन कमी पडले. अजित पवार उत्तम प्रशासक मानले जातात. त्यांनी आपली क्षमता दारूबंदीच्या चांगल्या अंमलबजावणी वापरावी. दारूबंदीची चांगली अंमलबजावणी आणि सामाजिक जागृती व्हावी यासाठी गडचिरोली जिल्ह्यात मुक्तिपथ नावाचा प्रयोग गेली तीन वर्ष करण्यात आला. दारूबंदी आणि मुक्तिपथ या संयुक्त प्रयत्नाने गडचिरोली ची दारू ६० ते ६५ टक्क्याने कमी झाली. जगभरात मृत्यू, रोग आणि अपंगत्व निर्माण करणार्‍या प्रमुख सात कारणांमध्ये एक दारू असल्याचे जागतिक आरोग्य संघटना म्हणत आहे.

त्यामुळे दारू कमी करण्याचा विचार करा. दारू पाजून रोग, अपघात आणि बलात्कार वाढवू नका, असे मी महाराष्ट्र शासनाला नम्र आवाहन करतो.

डॉ. अभय बंग, मुक्तीपथ

You might also like