विशेष प्रतिनिधी । अर्थशास्त्रज्ञ अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार सोमवारीच जाहीर झाला. या पुरस्कारानंतर आता समोर येते आहे ती त्यांच्या तुरुंगवारीची चर्चा. अभिजित बॅनर्जी हे जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे अर्थात जेएनयुचे विद्यार्थी होते. विद्यार्थी दशेत असताना त्यांना १० दिवस तिहार तुरुंगात रहावे लागले होते. जेएनयूचे त्यावेळचे अध्यक्ष एन. आर. मोहांती यांना विद्यापीठातून निलंबित करण्यात आले. मोहंती यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध म्हणून शेकडो विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारले. या विद्यार्थ्यांवर अटकेची कारवाई करण्यात आली. या विद्यार्थ्यांमध्ये अभिजित बॅनर्जी यांचाही सहभाग होता. त्यामुळे त्या काळात त्यांना १० दिवस तुरुंगात रहावे लागले होते.
१९८३ मध्ये जेएनयुतलं वातावरण ढवळून निघालं. विद्यार्थी संघटनेची जी निवडणूक झाली तिथे डाव्या विद्यार्थी संघटनेचा पराभव झाला होता. या पराभवामुळे जेएनयु प्रशासनही नाखुश होतं. त्यावेळी मोहंती यांनी विद्यार्थी संघटनेचं अध्यक्षपद पटकावलं होतं. मोहंती यांना अभिजित बॅनर्जींनी पाठिंबा दिला होता. त्यावेळच्या घटनेबाबत मोहंती सांगतात, “जेएनयु प्रशासनाने एका विद्यार्थ्याला वसतिगृहाच्या बाहेर काढलं होतं. त्यावरुन विद्यार्थ्यांमध्ये नाराजी होती. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली जावी अशी मागणी करण्यात आली. हॉस्टेलमधून काढण्यात आलेल्या विद्यार्थ्याने एका शिक्षकाविरोधात तक्रार केली होती. त्यानंतर इतर विद्यार्थ्यांनीही त्या शिक्षकांना निलंबित करण्यात यावं अशी मागणी केली. विद्यार्थी संघटनेबाबत प्रशासन समाधानी नव्हतं त्यामुळे चौकशी झाली नाही. आम्हीही आमच्या मागणीवर ठाम राहिलो. दरम्यान प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या वसतीगृहातील खोलीला कुलुप लावलं त्यामुळे प्रकरण जास्त चिघळलं” असं मोहंती सांगतात.
दरम्यान हे कुलुप विद्यार्थ्यांनी तोडलं आणि संबंधित विद्यार्थ्याला त्या खोलीत नेलं. ज्यावरुन बराच गदारोळ झाला होता. विद्यापीठ प्रशासनाने मोहंती, युनियन सेक्रेटरी आणि विद्यार्थी या तिघांचं निलंबन केलं. या कारवाईनंतर शेकडो संतप्त विद्यार्थ्यांनी कुलगुरुंना घेराव घातला होता. ज्यामध्ये पोलिसांनी हस्तक्षेप करत १० जणांना अटक केली. ज्यामधले एक अभिजित बॅनर्जीही होते.