हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले हे अपक्ष उमेदवार म्हणून पुणे विभाग पदवीधर मतदार संघात उभे राहिले आहेत. त्यासाठी त्यांनी जोरदार प्रचार सुद्धा केला होता. मात्र, अभिजित बिचुकले यांचं नावच मतदार यादीतून गायब झालं आहे. नाव मतदार यादीतून गायब झाल्यानंतर बिचुकले यांनी निवडणूक आयोगाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.
अभिजित बिचुकले यांनी पुणे विभाग पदवीधर मतदार संघासाठी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. आज मतदानाच्या दिवशीच बिचुकले यांचे नाव मतदान यादीतून गायब झालं आहे. बिचुकले यांना मतदान यादीत नाव नसल्याचं कळताच मतदान केंद्रावर गोंधळ घातला असून प्रशासनाच्या कारभारावर टीकेची झोड उठवली आहे. बिचुकले साताऱ्यातील मतदान केंद्रावर गेले असता त्यांना झालेला प्रकार लक्षात आला. मतदान यादीत पत्नी अलंकृता बिचुकले यांचं नाव होतं मात्र, अभिजीत बिचुकलेंचं नावाच्या जागी नारायण बिचुकले अशा दुसऱ्याच व्यक्तीचं नाव होतं.
“मी उमेदवार असून माझं नाव यादीत नाही, तर सर्वसामान्यांचं काय? कोणीही येऊन इथं मतदान करेल. सर्व आपले बंधूभाव आहेत. मी कधीही जातीवर राजकारण केलं नाही. यांनी स्वत:ची नावं लिहीली. माझी नोंदणी झाली आहे. बायकोचं नाव आहे. पण माझं नाही. मी उमेदवार आहे. त्यामुळे मला मतदानापासून आता वंचित राहावं लागणार आहे. हा निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार आहे. निवडणूक आयोग अशाच प्रकारे जर काम करणार असेल तर सगळं अवघड आहे”, असं अभिजीत बिचुकले म्हणाले
दरम्यान, अभिजित बिचुकले हे नेहमीच आपल्या स्टाइल आणि रोखठोक भूमिकेसाठी ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी मुंबई मधील वरळी मतदारसंघातुन आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’