सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
नेहमीच आपल्या हटके स्टाईल साठी प्रसिद्ध असलेले कवी मनाचे नेते म्हणून ओळखले जाणारे साताऱ्याचे अभिजित बिचुकले यांनी आगामी विधानसभा निवडणुकी बाबत मोठी घोषणा केली आहे. येत्या 2024 विधानसभेच्या सर्वच्या सर्व 288 जागा आपण लढणार असल्याचे त्यांनी आज जाहीर केले आहे. तसेच अलंकृता बिचुकले यांच्या रूपाने महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळेल असेही त्यांनी म्हंटल.
सातारा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना बिचुकले म्हणाले, महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेला नेतृत्व नाही का? कोणीही उठतो आणि या पक्षातून त्या पक्षात जातो. हे सगळं कशासाठी चाललंय. यासाठी भावी महिला मुख्यमंत्री अलंकृता अभिजित बिचुकले यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या सर्वच्या सर्व 288 जागा लढवण्याचा संकल्प शिवरायांच्या राज्याभिषेक दिनी आम्ही केला आहे. त्या अनुशंघाने नवीन तडफदार आणि समाजाची तळमळ असलेल्या युवकांनी माझ्या नेतृत्वाखाली आमदारकीची तयारी करावी असे आवाहनही अभिजित बिचुकले यांनी यावेळी केलं.
दरम्यान, राज्यातील मुलींचे सबलीकरण करण्यासाठी त्यांना शिक्षण देणं गरजेचं आहे. राज्य शासनाने बालवाडी ते 10 वी पर्यंतचे मुलींना सर्व शाळांमध्ये मोफत शिक्षण द्यावे अशी मागणी देखील बिचुकले यांनी केली आहे. तशा आशयाचे पत्र देखील बिचुकले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहे. तसेच शिवरायांचा ३४९ वा राज्याभिषेक असताना सरकारने ३५० वा करून टाकला असं म्हणत त्यांनी सरकारवर टीकेची झोडही उठवली.