औरंगाबाद – कोरोनामुळे सर्व सण-उत्सव साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले. आता सर्वत्र निर्बंध हटविण्यात येत असल्याने काळजी घेत नागरिक सण उत्सव आनंदाने साजरे करू लागले आहेत. आज मंगळवारी कोजागरी पोर्णिमा साजरी करण्यात येत आहे. यासाठी शहरात जवळपास साडे चार ते पाच लाख लिटर दूध विक्री होणार आहे, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याच अनुषंगाने जिल्हा दूध संघाने नियोजनही करून ठेवले असल्याची माहिती जिल्हा दूधसंघाचे व्यवस्थापक पी.बी. पाटील यांनी सोमवारी दिली आहे.
कोजागरी पौर्णिमेला शहरात लाखो लिटर दुधाची विक्री दरवर्षी होत असते. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे कोजागरी साध्या पद्धतीने साजरी करण्यात येत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने गणेशोत्सवासह नवरात्रोत्सव, विजया दशमी सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. यामुळे आजची कोजागरी पौर्णिमाही जोरदार साजरी होण्याची शक्यता आहे. याच अनुषंगाने जिल्हा दूध संघाने नियोजन केले आहे. जिल्हा दूध संघातर्फे नियमीत 30 ते 35 हजार लिटर दूध विक्री होते. यात आता कोजागरीमुळे जवळपास 40 ते 45 हजार लिटर दुधाची अतिरिक्त मागणी राहणार आहे.
मुंबईला पाठविणारे टॅंकर थांबविले
औरंगाबाद जिल्हा दूध संघातर्फे नियमितपणे मुंबईला 15 ते 20 हजार लिटर दूध टॅंकरच्या माध्यमातून पाठविण्यात येते. मंगळवारी साजरी होणारी कोजागरी पौर्णिमानिमित्ताने जिल्हा दूध संघातर्फे मुंबईला पाठविण्यात येणारे सर्व टॅंकर थांबविण्यात आले आहे. हेच दूध आता शहरात कोजागरी निमित्ताने वाटप केले जाणार आहेत. कोजागरीला दुधाची मागणी ज्या प्रमाणे वाढेल त्याच प्रमाणे संकलनही वाढविण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.