महाबळेश्वर |अजय नेमाने
महाबळेश्वरची थंड हवेचे ठिकाण म्हणून मोठी खासियत आहे. ती सगळ्यांना माहीतच आहे. परंतु स्ट्रॉबेरीसाठी आणि त्याउपर वेगवेगळ्या फ्लेवरच्या मधासाठी महाबळेश्वर खूप प्रसिद्ध आहे. बाभूळ, कारवी, जांभूळ, लिंब असे विविध प्रकारचे मध या भागात बघायला मिळतात. अशाच एका सहकार तत्वावर चालणाऱ्या महाबळेश्वर येथील मधोत्पादक केंद्राला भेट दिली. तेथील विक्री विभागातील अरुण यादव यांनी दिलेली माहिती.
मधमाशांची पेटी ¶
एका पेटीमध्ये फक्त एकच राणीमाशी आढळते. सहा ते सात पोळे एका पेटीमध्ये असतात. ती माशी कुत्रीम पद्धतीने तयार केलेल्या पेटीतील पोळ्यात अंडी घालते. इतर माशा या फुलांचे परागकण शोषतात आणि मधाच्या स्वरूपात पेटीमध्ये जमा करतात. या माशा फक्त कार्य करतात. त्यांची प्रजननाची क्षमता नसते. राणीमाशी ही प्रजननासाठी जंगलामध्ये जाते. तिचा प्रजननाचा कालावधी ५ ते ६ दिवसांचा असतो. त्यानंतर नराला इतर मधमाशा मारून टाकतात. मधमाशांमधील नर(ड्रोन) फक्त प्रजननाचे काम करतात. मध गोळा करत नाहीत तर फक्त खाण्याचे काम करतात. त्यानंतर अंडी घातली जातात आणि काही दिवसांनी मधाचे पोळे भरू लागते. त्यातील मध हा मशीनद्वारे शास्त्रशुद्ध पद्धतीने काढून घेतला जातो; अशा मधाला ‘सुपर मध’ म्हणतात.
मधोत्पादक केंद्राबद्दल¶
महाबळेश्वर मधोत्पादक सहकारी केंद्रामध्ये दोन हजार सभासद आहे. त्यांच्याकडे प्रत्येकी ५० ते २०० मधमाशांच्या पेट्या दिल्या जातात. ऑक्टोबरपासून वेगवेगळ्या मधमाशांच्या जातीचा सिझन चालू होतो. मग कुणी जंगलामध्ये पेट्या ठेवते तर कुणी घरीच ठेवते. तसेच झाडाच्या डोलीला असलेले मोहोळाकडे सुद्धा लक्ष दिले जाते. यातून मिळणाऱ्या मधाला प्रतिकिलो ४०० रुपयांपर्यंत दर मिळतो. या प्रकल्पाअंतर्गत वर्षाकाठी ५० ते ६० टन मध मिळतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी मधुमक्षिकापालन हा व्यवसाय म्हणून खूप चांगला आहे. पोळ्याचा वापर हा दोन ते तीन वर्षे करता येतो. साधारणतः एक पेटीमधून आठवड्यात २ ते ३ किलो मध मिळतो. अशी माहिती मधूसागर प्रकल्पाचे विक्री अधिकारी अरुण यादव यांनी दिली.
घरी असल्यावर मधाची गुणवत्ता कशी ओळखाल?
सुरुवातीला एक भांडे घ्यावे. त्या भांड्यात पाणी ओतून पूर्ण भरून घ्यावे. नंतर त्या भांड्यात हळूहळू मध टाकावा व निरीक्षण करावे. पूर्ण मध जर भांड्याच्या बुडात साचलेला असेल तर तो मध १००% गुणवत्तापूर्ण मध आहे. असे समजावे. तसे न होता जर मध पाण्यावर तरंगू लागला आणि तो पाण्यात एकजीव झाला तर, समजावे आपल्याकडील मध भेसळयुक्त आहे.
राणीमाशी कशी ओळखाल?
राणीमाशी ही आकाराने मोठी असते. ती पेटीच्या बाहेर येत नाही(अपवाद : प्रजननाचा कालावधी).
राणीमाशी काम करणाऱ्या माशांपेक्षा मोठी असते.
रॉयल जेलीचे (मध) सेवन केल्याने काय होते?
रॉयल जेलीचे सेवन केल्याने, ५० वर्ष वय असलेली व्यक्ती ३० वर्ष वय असल्यासारखे दिसायला लागते. आशाप्रकारचा मध फक्त स्वित्झर्लंड देशात मिळतो. मधाचा दर तब्बल ५० हजार रु प्रतिकिलो एवढा आहे.
पोळ्यातून शुद्ध मध बाहेर कसा केला जातो?
१)कच्चा मध गोळा केला जातो आणि तो मध पहिल्या क्रमांकाच्या स्टीलच्या कॅनमध्ये ओतला जातो.
२)स्टीलच्या कॅनला पाईपाद्वारे डबल कॅटल असलेल्या ‘स्टीम बॉयलरला’ जोडलेले असते. आत आणि बाहेर असे दोन कॅटल असतात. पहिल्या कॅटलमध्ये कॅनमधील मध सोडला जातो व बाहेरील कॅटलमध्ये फक्त गरम पाणी असते. पाण्याला ४५℃ पर्यंत तापवले जाते. आणि मध गरम केला जातो.
३)हानी फिल्टर्समधून फक्त मध बाहेर येतो. कचरा आणि इतर टाकाऊ गोष्टी खालच्या बाजूला साचल्या जातात. हा गरम मध १२ तास थंड होण्यासाठी ठेवला जातो (नैसर्गिकरित्या थंड केला जातो). ज्याप्रकारे गरम केलेल्या दुधावर साई येते. तशाच प्रकारे मधावर ‘फम’ तयार होतो. त्याचा वापर मधमाशांच्या खाद्यासाठी केला जातो.
४)प्रत्येक पॉइंटला पांढऱ्या कापडाने मध गाळून घेतला जातो.
५)शेवटी १००, २५०, ५००, १००० ग्रॅमच्या पॅकिंगमध्ये मध पॅक केला जातो.
इतर महत्वाचे-