औरंगाबाद – कंत्राटदाराच्या वीज बिलाची रक्कम कमी करण्यासाठी तब्बल 30 हजार रुपयांची लाच घेताना जालना येथील महावितरणच्या उपविभागीय कार्यालयातील अतिरिक्त कार्यकारी अभियंता सह त्याच्या पंटरला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहात पकडले. विशेष म्हणजे औरंगाबादच्या लाचलुचपत पथकाने जालन्यात जाऊन ही कारवाई केली. कार्यकारी अभियंता देवानंद मोरे आणि खाजगी पंटर दीपक नाडे अशी आरोपींची नावे आहेत.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार हे सोलर पॅनल बसवून देण्याचा व्यवसाय करतात. त्यांच्या ओळखीच्या एका व्यक्तीला जास्त वीजबिल आले होते. या बिलाची रक्कम कमी करण्यासाठी त्यांनी कार्यकारी अभियंता मोरे यांची भेट घेतली. तेव्हा त्यांनी 30 हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने, त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या औरंगाबाद परिक्षेत्राचे अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांच्याकडे तक्रार केली. यानंतर पोलीस उपनिरीक्षक रूपचंद वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संदीप राजपूत, हवालदार बाळासाहेब राठोड, दिगंबर पाठक, केवलसिंग गुसिंगे, चालक चंद्रकांत शिंदे यांच्या पथकाने लाचेच्या मागणीचे पडताळणी केली. तेव्हा तक्रारदाराकडे मोरे यांनी पुन्हा 30 हजार रुपये लाच मागितली, आणि 7 सप्टेंबर रोजी लाचेची रक्कम घेऊन बोलावले.
त्याप्रमाणे मंगळवारी सकाळी एसीबीचे अधिकारी कर्मचारी यांनी आरोपीला पकडण्यासाठी सापळा रचून, तक्रारदार यांना लाचेची रक्कम घेऊन मोरे यांच्याकडे पाठवले. मोरे यांनी लाचेची रक्कम त्यांचा पंटर खासगी वाहनचालक दीपक नाळे यांच्याकडे देण्यास सांगितले. मोरे यांच्या सांगण्यावरून नाडीने तक्रारदार यांच्या कडून लाचेचे 30 हजार घेताच दबा धरून असलेल्या साध्या वेषातील पोलिसांनी त्यास रंगेहात पकडले. यानंतर मोरे यांनाही ताब्यात घेण्यात आले. या प्रकरणी जालना येथील कदीम पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.