हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | नाशिक – धुळे दरम्यान चांदवड तालुक्यातील नमोकार तीर्थक्षेत्रा समोरील मुंबई -आग्रा महामार्गावर कार व कंटेनर यांच्यामध्ये भीषण अपघात (Car – Container Accident) झाला आहे. आज सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या भीषण अपघातात कारमधील ४ जण जागीच ठार झाले. यामध्ये भाजपच्या नगरसेवकाचा समावेश आहे. सर्व मृत प्रवासी हे धुळे जिल्ह्यातील रहिवासी असल्याची माहिती आहे.
नेमक काय घडलं?
कार मधील प्रवासी धुळे येथील रहिवासी असून ते नाशिक येथून धुळे येथे रवाना झाले होते. त्याचवेळी नमोकार तीर्थक्षेत्रा समोरील मुंबई-आग्रा महामार्गावर कार आणि कंटेनरची समोरासमोर धडक झाली आणि हा भीषण अपघात झाला. यांमध्ये ४ जणांना आपले प्राण गमवावे लागले. अपघाताची तीव्रता अधिक असल्याने कारचे मोठे नुकसान झाले आहे तर अपघातामध्ये भाजपचे नगरसेवक किरण अहिरराव यांचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात शोक व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, कार व कंटेनर मध्ये झालेल्या या अपघाताची घटना घडल्याचे कळताच वडनेरभैरव पोलीस व सोमा टोलवेज कंपनीचे अपघातग्रस्त पथक घटनास्थळी पोहचले. त्यांनी अपघातग्रस्त वाहनांची पाहणी केली आहे. अपघातानंतर नाशिक – धुळे महामार्ग काही काळासाठी ठप्प झाला होता. परंतु आता वाहतूक सुरळीत करण्यात वाहतूक पोलिसांना यश आले आहे.