सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
पुणे- बेंगलोर आशियाई महामार्गावर खंबाटकी बोगदा व एस कॉर्नरच्या उतारावर लोखंडी सळ्या घेऊन निघालेला ट्रेलर पलटी झाला. यामध्ये चालक व क्लिनर दोघेही जागीच ठार झाले. सकाळी सव्वा सातच्या दरम्यान हा अपघात झाला. खंबाटकी घाट उतरल्यानंतर चालकाचे वाहनांवरील नियंत्रण सुटले होते.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एस काॅर्नरच्या उतरावर सळ्या घेवून जाणार ट्रेलर पलटी झाला. या अपघात सूरज हैदर शेख (वय- 24), विष्णू गोपाळ दूरनर (वय- 22, दोघेही रा. वेळेगाव, ता. अहमदपूर, जि. लातूर) यांचा मृत्यू झाला आहे. बेंगरूटवाडी गावाजवळ महामार्गावरून पुणे बाजूकडे जात असणार्या रामदास ट्रान्सपोर्ट सर्व्हिसचा ट्रेलर (क्र. एम.एच. 46 एच. 5159) चा अपघात झाला. खंबाटकी बोगदा ओलांडल्यानंतर असणार्या तीव्र उतारावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे धोम बलकवडी कॅनॉलच्या वळणावर ट्रेलर रस्ता सोडून बाजूला गेला. पुढे चढ व दगडात ट्रेलर पलटी होणार या भीतीने क्लिनरने उडी टाकली. मात्र, दुर्देवाने तो चाकाखाली येऊन चिरडला गेला. तर ट्रेलर चढावर जाऊन पलटी झाला. यात सळ्या केबिनमध्ये घुसल्याने केबिनसह चालकाचा चुराडा झाला.
घटनेचे गांभीर्य पाहता पोलिस निरीक्षक महेश इंगळे, पोलिस उपनिरीक्षक पांगारे, पोलिस हवालदार धुमाळ, मोरे, वाहतूक पोलिस फरांदे, कुंभार, पोलिस नाईक प्रशांत धुमाळ व जगदाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. मृताचे शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी महामार्गावरील इतर गाड्यांचा सुदैवाने बचाव झाला.