मुंबई– राज्यातील महत्वाच्या प्रकल्पांचे तातडीने भूसंपादन करा, कोणतेही प्रकल्प हे लांबणीवर पडू नये यावर भर द्या अशा सूचना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अधिकाऱ्यांना दिले. राज्यातील महत्वाच्या पायाभूत प्रकल्पाची स्थिती तपासण्यासाठी मुख्यमंत्रांची वर्षा या शासकीय निवासस्थानी उच्यस्तरीय अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. बैठकीमध्ये रस्ते, महामार्ग, रेल्वे आणि विमानतळ या प्रकल्पांच्या भूसंपादनाची स्थिती समजून घेऊन भूसंपादनाची कामे निर्धारित वेळेनुसार पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले.
या बैठकीत बोलताना फडणवीस यांनी कोणत्याही प्रकल्पाला विलंब होऊ नये. याची काळजी घेण्याच्या सूचना केल्या. प्रकल्प विलंबनामुळे प्रकल्पाच्या किमती वाढत आहेत. त्यामुळे सर्व विभागांना विशिष्ट वेळापत्रके देण्यात आली आहेत आणि त्यांचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे,” असे मुख्यमंत्री बैठकीत म्हणाले. अधिकाऱ्यांनी ‘मिशन मोड’मध्ये काम करण्याचे आणि भूसंपादन तातडीने, गांभीर्याने आणि कार्यक्षमतेने करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. त्याच बरोबर या प्रकल्पासाठी वित्त विभागाकडे निधी देण्याची शिफारस करत राज्यातील प्रकल्पाचा आढावा देखील फडणवीस यांनी घेतला आहे.
महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी निधीचे वाटप
राज्यातील महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांशी संबंधित भूसंपादनासाठी ५३,३५४ कोटी रुपयांची तरतूद करण्याची शिफारस मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.तर शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी १२,००० कोटी रुपये देण्याचे निर्देश वित्त विभागाला देण्यात आले आहेत.
कोणकोणत्या प्रकल्पाचा आढावा घेतला?
देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग, विरार-अलिबाग कॉरिडॉर, जालना-नांदेड द्रुतगती महामार्ग, पुणे रिंग रोड (पूर्व, पश्चिम आणि विस्तार), भंडारा-गडचिरोली द्रुतगती महामार्ग, नागपूर-चंद्रपूर द्रुतगती महामार्ग, नागपूर-गोंदिया द्रुतगती महामार्ग आणि वाढवन-इगतपुरी द्रुतगती महामार्ग त्याचबरोबर वर्धा-नांदेड आणि वर्धा-गडचिरोली या रेल्वे मार्गचा हि आढावा घेतला. तसेच कोल्हापूर, कराड, अकोला, गडचिरोली आणि छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळांसाठी भूसंपादन स्थितीबाबत हि आढावा घेतला.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) अंतर्गत प्रकल्प:
शक्तीपीठ महामार्ग
मल्टी मॉडेल कॉरिडॉर (MMC)
जालना नांदेड एक्सप्रेसवे
पुणे रिंग रोड पश्चिम (PRR-West)
पुणे रिंग रोड पूर्व (PRR-East)
पुणे रिंग रोड पूर्व विस्तारिकरण (PRR-East-Ext)
वाढवण – इगतपुरी द्रुतगती महामार्ग
विदर्भातील महत्त्वाचे प्रकल्प :
भंडारा गडचिरोली एक्सप्रेसवे
नागपूर चंद्रपूर एक्सप्रेसवे
नागपूर गोंदिया एक्सप्रेसवे
नवेगाव (मोर) सुरजागड मिनरल कॉरिडॉर
रेल्वे प्रकल्प:
वर्धा – नांदेड
वडसा – गडचिरोली
विमानतळ विकास प्रकल्प:
कोल्हापूर विमानतळ
कराड विमानतळ
अकोला विमानतळ
गडचिरोली विमानतळ
छत्रपती संभाजीनगर विमानतळ