सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात अवैध वाळू उपसा चालू असलेल्या दोन ठिकाणी पोलिसांनी कारवाई केली आहे. सातारा व पाटण तालुक्यातील या दोन्ही कारवाईत जवळपास 47 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सोनगाव संमत निंब (ता.सातारा) येथे वाळू उपशावर छापा टाकून शहर पोलिसांनी तब्बल 41 लाख 20 हजार रुपयांचा तर कोंजवडे (ता. पाटण) गावच्या हद्दीत 5 लाख 66 हजार रुपये असा एकूण 46 लाख 86 हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. तसेच दोन्ही कारवाईत एकूण तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनगाव संमत निंब (ता.सातारा) येथे वाळू उपशावर छापा अनिकेत दिलीप डांगे (वय- 21, रा. क्षेत्रमाहुली, ता. सातारा) व जनार्दन जयवंत देसाई (रा. कार्वे, ता. कराड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यातील अनिकेत डांगे याला पोलिसांनी अटक केली आहे. तर उंब्रज पोलिसांनी केलेल्या कोंजवडे येथील कारवाईतील संशयिताचे अमित कृष्णात जाधव (रा. तारळे) असे नाव आहे.
सातारा शहर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक चेतन मछले यांना सोनगाव सं. निंब येथील कृष्णा नदीपात्रात वाळूउपसा सुरू असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला. यावेळी वाळूचे उत्खनन सुरू असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी डांगेला ताब्यात घेऊन चौकशी केली. या कारवाईत जेसीबी, पोकलॅन, दोनचाकी ट्रॅक्टरची हायड्रोलिक ट्रॉली, दुचाकी, वाळूचे ढीग असा ऐवज जप्त करण्यात आला आहे. वाळूचे हे बेकायदा उत्खनन असल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले. त्यानंतर दोघांवर गुन्हा दाखल करून डांगेला अटक करण्यात आली.
उंब्रज पोलिसांची कारवाई
कोंजवडे (ता. पाटण) गावच्या हद्दीत अवैध वाळू उपसा करून वाहतूक करताना एकाला ट्रक्टरसह रंगेहाथ पकडले. उंब्रज पोलिसांनी ही कारवाई केली. त्याच्याकडून 5 लाख 66 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. अमित कृष्णात जाधव (रा. तारळे) असे पोलिसांनी कारवाई केलेल्या संशयिताचे नाव आहे. सपोनि अजय गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार देवकुळे, हवालदार देशमुख, माने यांनी ही कारवाई केली. अधिक तपास पवार करत आहेत.