गणेशोत्सवात डाॅल्बी, डीजेच्या मोठ्या आवाजावर कारवाई होणारच : बी. आर. पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

गणेशोत्सव काळात कोव्हीडमधील निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली आहे. मात्र, डीजे, डाॅल्बीला किंवा अन्य कोणत्याही ध्वनिक्षेपकावर आवाजाची मर्यादा कोर्टाच्या नियमानुसार आखण्यात आली आहे. त्यामुळे गणेश मंडळांनी नियम, शिथिलता यांची माहिती घेवूनच गणेशोत्सव साजरा करावा. अन्यथा पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल, असे स्पष्टच कराड शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील यांनी सांगितले.

कराड येथील अर्बंन बॅंकेच्या शताब्दी हाॅलमध्ये आयोजित गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित गणेश मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्याधिकारी रमाकांत डाके, डाॅ. रणजित पाटील, माजी नगरसेवक विनायक पावसकर, साैरभ पाटील, फारूख पटवेगार, आनंदराव लादे, उद्योजक अजित सांडगे, पोपटराव पवार, नितीन काशिद यांच्यासह गणेश मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

बी. आर. पाटील म्हणाले, कोरोना काळात असलेले मास्क घालणे, गर्दी करू नये या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. परंतु गणेशोत्सवासाठी कायदा, सुवव्यवस्था राखण्यासाठी काही सूचना आहेत. तेव्हा मंडळांनी अपुऱ्या व अफवावर विश्वास न ठेवता, योग्य माहिती घेवूनच गणेशोत्सव साजरा करावा. पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा.

पोलिसांची गणराया अॅवार्ड स्पर्धा : – कराड शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत गणराया अॅवार्ड स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये काही सूचना व नियम आहेत, त्यानुसार आदर्श गणेशोत्सव मंडळांना गाैरविण्यात येणार आहे. शहर पोलिस ठाणे हद्दीतील तीन क्रमांक पटकाविणाऱ्या मंडळांना प्रशस्तीपत्रक, सन्मानचिन्ह देवून पोलिस अधिकाऱ्यांच्या हस्ते गाैरविले जाईल, असेही बी. आर. पाटील यांनी सांगितले.

एक खिडकी, एक योजना राबवा – विनायक पावसकर : –अनेकदा गणेश मंडळांना परवानगीसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. तेव्हा नगरपालिका आणि पोलिस प्रशासनाने एक खिडकी एक योजना राबवावी. धर्मादाय कार्यालयाने यावर्षी नियमात शिथिलता द्यावी. कोरोनामुळे दोन वर्षे गणेश उत्सव साध्या पध्दतीने साजरा केला आहे. त्यामुळे कागदपत्रांची सरबत्ती करू नये, अशीही मागणी भाजपाचे माजी नगरसेवक विनायक पावसकर यांनी केली.