हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम आहे. या उत्सवात देखील सर्वजण मोठ्या उत्साहाने सहभागी होतात. आता अभिनेते किरण माने यांनी कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील एका मुस्लिम कुटुंबीयाबद्दल फेसबुक पोस्ट लिहिली आहे. मुस्लिम कुटुंबातील समीर हुसेन संदे यांनी घरात गणपती बसवल्याने त्यांच्या या सामाजिक एक्याच्या कृतीचं मानेनी कौतुक केलं आहे.
सातारचा बच्चन असलेल्या किरण मानेने एक फेसबुक पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी लीहले आहे की, कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक गावात असलेल्या जनाब समीर हुसेन संदे या मुस्लीम बांधवाच्या घरात बसवलेल्या गणपती बाप्पाचा फोटो बघून लै लै लै भारी वाटलं भावांनो ! समीरभाई माझे फॅन असल्याचा अभिमान वाटला. कारन हे हायेत आपले खरे संस्कार… आन् हीच हाय आपल्या संविधानातली ‘बंधुता’ !
अभिनेते किरण मानेंनी केलं कराडच्या रेठरे बुद्रुकमध्ये घरात गणपती बसवलेल्या मुस्लीम समीर भाईंच कौतुक !
समीर भाईनी मानले मानेंचे आभार pic.twitter.com/o28Mdq0wO8
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) September 22, 2023
रेठरे बुद्रूक गांवातला आमचा समीरभाई म्हन्जे कवीमनाचा संवेदनशील मानूस. ज्या भक्तीभावानं तो अल्लाहची इबादत करतो, तेवढीच अदब तो गणपतीची पूजा करतानाबी ठेवतो. रमज़ानमध्ये रोज़ा ठेवन्यासोबतच नवरात्रीत उपास करनं हा बी आपला ‘फ़र्ज़’ मानतो. अशा नादखुळा मानसाचा ‘ज़मीर’ किती निर्मळ, नितळ आसंल गड्याहो !
ही अख्खी फॅमिलीच लै लै लै जबराट हाय. समीरभाईचे वडिल पै. हुसेनभाई यांच्या जोपर्यन्त जीवात जीव होता… पाय साथ देत होते… तोपर्यन्त किल्ले मच्छिन्द्रगडवरची मच्छिन्द्रनाथाची दर रविवारची पहाटेची आरती त्यांनी कधी चुकवली नाय !
मला राहून-राहून वाटतं रेठरे बुद्रुक गांवाला ‘मानवता जपनारं लोभस गांव’ म्हनून पुरस्कारच देऊन टाकावा. अहो, खरंच या गांवाचे एकेक किस्से म्हन्जे द्वेषाचं विष पसरवू पहानार्यांना सन्नकन् कानाखाली हानल्यागत हाय. रेठऱ्याच्या जोतिबाची पालखी दरवर्षी दसऱ्याच्या जागराला निघते. या पालखीचा मान आजबी मुस्लिम समाजाला हाय ! रेठऱ्यात रहिमतबुवा आन् पीर साहब यांच्या दोन छोट्या दर्गा हायेत. तिथं हिंदू बांधव मोठ्या श्रद्धेनं चादर चढवताना आन् दुवा मागताना दिसतात.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid027btvsEFFkweisU7as3HKsRaoh2EJvzD5rFrdysTKEvMTLit7pg4Wy4vTDBv7Kudtl&id=1460418198&mibextid=2JQ9oc
याच रेठर्यातले गनीभाई, ज्यांना ‘प्यारन भाभीचा गनी’ म्हनायचे, ते एकतारी भजनातले ‘नुसरत फ़तेह अली ख़ान’ होते. अशा खनखनीत आवाजात पांडुरंगाला साद घालायचे की साक्षात इठूराया भजनात यिवून नाचून जात आसंल! त्यांचेच जिगरी दोस्त, रेठर्याचेच रामभाऊ सातपुते दरवर्षी न चुकता रमज़ानच्या महिन्यात रोज़े धरत. रेठऱ्यात मानाचे तीन गणपती असतात. त्या गणपतींचा आगमन व पालखीचा मान ‘नाभिक’ समाजाला देन्याची परंपरा पूर्वीपास्नं चालत आलेली हाय.
अजून काय सांगू? आज मानसामानसात फूट पाडू पहानार्या काळात, प्रेमाचा संदेश देनारं रेठरे बुद्रुक हे गांव महाराष्ट्रात आदर्श ठरावं असं हाय. रेठर्याच्या मातीतल्या माझ्या बांधवांना कळलंय, कृष्णामाईचं पानीबी तहान भागवताना कधी भेदभाव करत नाय… आन् चौकातलं वडाचं झाडबी सावली देताना जातधर्म बघून देत नाय. भेदाभेद आन् द्वेष हे रिकाम्या टाळक्यांनी उकरून काढलेले धंदे हायेत. म्हनूनच अकबर इलाहाबादी म्हनायचा,
“मज़हबी बहस मैंने की ही नहीं
‘फ़ालतू अक़्ल’ मुझ में थी ही नहीं !”
– किरण माने.