हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित ‘द फॅमिली मॅन २’ ही वेब सीरीज गेल्या काही दिवसांपासून मोठ्या वादात अडकली आहे. या वेबसिरीजचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर यामध्ये तामिळ लोकांना दहशतवादी म्हणून दाखविल्याचा आरोप केला जात आहे. लोकांच्या म्हणण्यानुसार, या सीरीजमध्ये श्रीलंकेत आपल्या हक्कासाठी लढा देणाऱ्या तामिळ बंडखोरांना आय एस आय एसशी संबंधित असल्याचे दाखवण्यात आलेले आहे. त्यामुळे तामिळनाडूच्या मंत्र्यांनी या वेब सीरीजवर बंदी घालावी, अशी मागणी जोरदार होत आहे. आता मात्र या वेब सीरीजचे निर्माते आणि मनोज बाजपेयी यांनी या वादासंदर्भात एक निवेदन जारी केले आहे.
https://www.instagram.com/p/CPSWEKlnEnq/?utm_source=ig_web_copy_link
निर्मात्यांनी सादर केलेले निवेदन रिपोस्ट करताना अभिनेता मनोज बाजपेयीने ‘द फॅमिली मॅन २’च्या संपूर्ण टीमच्या वतीने आपले स्पष्टीकरण दिले आहे. त्याने लिहिले की, ‘ट्रेलरचे काही शॉट्स पाहिल्यानंतर सीरीजबद्दल अनेक गृहितक तयार केली जात आहेत. आमच्या शोमधील बरेच कलाकार, क्रिएटिव टीमचे आणि लेखक टीमचे मेंबर्स तामिळ आहेत. आम्हाला तामिळ लोक आणि तामिळ संस्कृतीबद्दल माहित आहे आणि आम्ही तामिळ लोकांचा खूप आदर करतो. त्यांच्यावर प्रेम करतो.’ ‘आम्ही बर्याच वर्षांपासून या सीरीजसाठी कठोर परिश्रम घेतले आहेत आणि आम्ही प्रेक्षकांसमोर एक संवेदनशील, संतुलित कहाणी या शोच्या पहिल्या सीझनमधून आणली आहे. आम्ही तुम्हा सर्वांना विनंती करतो की, आपण प्रतीक्षा करा आणि शो प्रदर्शित होऊ द्या. आम्ही आशा करतो की, सीरीज पाहिल्यानंतर आपण त्याचे नक्की कौतुक कराल.’
https://www.instagram.com/p/CPTC8LknNym/?utm_source=ig_web_copy_link
तामिळनाडूचे माहिती तंत्रज्ञान मंत्री मनु थंगाराज यांनी केंद्रीय प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहीत या सीरीजवर बंदी घालण्याची मागणी केलेली आहे. अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणाऱ्या ‘द फॅमिली मॅन २’ या वेब सीरिजच्या ट्रेलरमध्ये तामिळ लोकांना चुकीच्या पद्धतीने दाखवले गेले आहे. या सीरीजमुळे तामिळनाडूतील लोकांच्या भावभावना दुखावल्या गेल्या आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. वेब सिरीजचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून लोक समंथावरही आपला संताप व्यक्त करीत आहेत. ही सीरीज करून समांथाने चूक केली आहे. या सीरीजचा तिच्या कारकीर्दीवर देखील प्रभाव पडू शकतो, अश्या प्रतिक्रियांनी लोकांनी दिल्या आहेत.
https://www.instagram.com/tv/CPDoCftnh43/?utm_source=ig_web_copy_link
या सिरीजमध्ये मनोज एका राष्ट्रीय तपास संस्थेमध्ये काम करणाऱ्या ‘श्रीकांत तिवारी’ची भूमिका साकारतोय. यापूर्वी हा सीझन फेब्रुवारीत प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोनामुळे त्याचे प्रदर्शन लांबणीवर पडले आहे. आता ही सीरीज ४ जून २०२१ रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये मनोज बाजपेयी, समंथा अक्किनेनी, सीमा बिस्वास, शरद केळकर, दर्शन कुमार, सनी हिंदुजा, शहाब अली आणि वेदांत सिन्हा हे कलाकार देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.