सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
अभिनेते सयाजी शिंदे यांनी चित्रपटात काम करतो, असे सांगून पैसे घेतल्यानंतरही काम न करता व परत पैसे माघारी न देता फसवणूक केल्याचा अर्ज वाई पोलिस ठाण्यात देण्यात आला आहे. शिवाजी उर्फ सचिन बाबूराव ससाणे (रा. वाई) यांनी सातारा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबतचे आरोप केले आहेत. मधुकर फल्ले यांच्याकडेही रक्कम दिली असल्याचे म्हटले आहे.
सचिन ससाणे म्हणाले, मी लेखक, दिग्दर्शक व निर्माता आहे. दोन महिन्यांपूर्वी पिक्चर करायचा असल्याचे ठरवून त्यासाठी अभिनेता म्हणून सयाजी शिंदे यांना घेण्यासाठी त्यांचे सहकारी मधुकर फल्ले यांच्यासोबत चर्चा केली. प्रत्यक्ष भेटीगाठी झाल्यानंतर सयाजी शिंदे यांनाही चित्रपटाची स्क्रीप्ट सांगण्यात आली. कामाचा मोबदला म्हणून प्रती दिवस 1 लाख रुपये घेणार असल्याचे ठरले. पाच दिवसांचे काम असल्याने त्या बदल्यात रोख 4 लाख रुपये व 1 लाख रुपये ट्रान्सफर करण्यात आले. चित्रपटाचे काम सुरु झाल्यानंतर मात्र स्क्रीप्टमध्ये सयाजी शिंदे यांनी मोठ्या प्रमाणात बदल करण्यास सांगण्यास सुरुवात केली. ही बाब पटली नाही. पैसे देतो असे सांगूनही सयाजी शिंदे व मधुकर फल्ले पैसे देत नसल्याची तक्रार केली आहे.
सयाजी शिंदेकडून कारवाईची पोलिस अधीक्षकांकडे मागणी
वाई येथील सचिन बाबुराव ससाणे याने 20 लाख रुपयांची माझी आर्थिक फसवणूक केली आहे. सदरची रक्कम देणे लागू नये म्हणून उलट माझ्याविरूद्ध खोटे तक्रारी अर्ज, बदनामीकारक मजकूर सोशल मीडियावर अपलोड केला जात आहे. वारंवार रात्री अपरात्री फोन करून शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी देत असून, त्याच्याविरूद्ध कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी पोलिस अधीक्षक समीर शेख आहे.