कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत थकबाकीदार शेतकऱ्यांना आधार प्रमाणिकरणानंतर दोन दिवसात त्यांच्या कर्ज खात्यावर रक्कम जमा होईल, असा दिलासा वरणगे येथे विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिला. करवीर तालुक्यातील वरणगे येथील थकबाकीदार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण प्रक्रियेची विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी आज प्रत्यक्ष पहाणी करुन माहिती घेतली. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा उप निबंधक अमर शिंदे, तहसिलदार शीतल मुळे-भामरे, गट विकास अधिकारी सचिन घाडगे, वरणगेच्या सरपंच अर्पणा पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते आधार प्रमाणिकरण नोंद पावतीचे वितरणही करण्यात आले.
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात 42 हजार 913 थकबाकीदार पात्र शेतकऱ्यांपैकी आतापर्यंत 38 हजार 200 थकबाकीदार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरणाची प्रक्रिया लवकरच पूर्ण करुन त्यांना कर्जमुक्त करण्याचे काम प्राधान्य क्रमाने हाती घेण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. आतापर्यंत जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे 109 कोटी रुपये जमा झाले असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत जिल्ह्यात थकबाकीदार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरणाचे काम गतीने सुरु असल्याबद्दल पुणे विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी समाधान व्यक्त केले. ज्या थकबाकीदार शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकरण झालेले नाही त्यांचे आधार प्रमाणिकरण तात्काळ करावे, अशी सूचना संबंधित विभागाला दिली. निवृत्ती तुकाराम पाटील, शिवाजी सखाराम तिबीले, पांडुरंग भैरु पाटील, दगडू दादू तिबीले, शालिनी बाळासो पाटील, अनिल तुकाराम पाटील आदी थकबाकीदार शेतकऱ्यांना आधार प्रमाणिकरण नोंद पावतीचे वितरण विभागीय आयुक्तांच्या हस्ते करण्यात आले.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.