औरगाबाद – वाढत्या उन्हामुळे शहरवासीयांची पाण्याची मागणीदेखील वाढली आहे. त्यामुळे जायकवाडी येथील पंपहाउसमध्ये अतिरिक्त पंप बसवण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे शहरात येणाऱ्या पाण्यात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शहराला सध्या अस्तित्वात असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो. शहराचा विस्तार व लोकसंख्या लक्षात घेता रोज किमान दोनशे एमएलडी पाण्याची गरज आहे, पण पाणी पुरवठा योजनेची अवस्था लक्षात घेता केवळ १२० एमएलडी पाण्याचा उपसा जायकवाडी येथील पंपहाउसच्या माध्यमातून केला जातो. शहरवासीयांना ९५ ते १०० एमएलडी पाणीच मिळते. गेल्या काही दिवसांपासून उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे पाण्याची मागणीदेखील वाढली आहे.
जायकवाडी धरणात मुबलक पाणी असताना पाणी पुरवठा योजनेची क्षमता नसल्यामुळे पुरेसे पाणी नागरिकांना दिले जात नाही. त्यातच पाण्याची मागणी वाढल्यामुळे टंचाईची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. याची दखल घेत शहराचा पाणी पुरवठा सुरळित ठेवण्यासाठी जायकवाडीत एक अतिरिक्त पंप सुरु करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी दिली. सध्या सात पंप सुरू आहेत. मेच्या पहिल्या आठवड्यापासून आणखी एक पंप सुरू केला जाईल. त्यामुळे काही प्रमाणात पाणी पुरवठा सुरळीत राहील, असा विश्वास धांडे यांनी व्यक्त केला.