रायगड : अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेमंडळी शिंदे- फडणवीस सरकार मध्ये सामील झाल्यानंतर काल राज्य मंत्रिमंडळाचा नव्याने विस्तार करण्यात आला. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ नेत्यांना वेगवेगळी खाती देण्यात आली तसेच शिंदे गट आणि भाजपच्या काही नेत्यांच्या खात्यात बदल करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादीचे बडे नेते सुनील तटकरे यांची कन्या आणि आमदार आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांना महिला व बालविकास विभागाची जबाबदारी देण्यात आली. महत्वाचे म्हणजे जबाबदारी स्वीकारल्यावर पहिल्याच दिवशी अदिती तटकरे यांनी रायगड जिल्ह्यातून आपल्या कामांना सुरुवात केली.
आदिती तटकरे यांनी सुधागड तालुक्यातील पाली येथील बेघरआळी अंगणवाडी केंद्राला भेट देऊन समस्या जाणून घेतल्या. तसेच इमारतीची पहाणी केली. या विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर राज्यातील महिलांसाठी असणाऱ्या अधिकाधिक योजना राबविण्याचा प्रयत्न करणार असून शक्य तितका न्याय देण्याचा प्रयत्न सुरू राहील असे मत आदिती तटकरे यांनी हॅलो महाराष्ट्र सोबत बोलताना व्यक्त केले.
यावेळी माझी कन्या भाग्यश्री योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मंत्री तटकरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तसेच यावेळी गरोदर मातेचे ओटीभरन व सहा महिने पूर्ण झालेल्या बालकाला अन्नप्राशन करण्यात आले.
रायगडचे पालकमंत्रीपद मिळणार का?
आदिती तटकरे यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर तटकरे यांच्याकडेच रायगडचे पालकमंत्री पद येणार अशा चर्चा सुरु झाल्या. त्यामुळे यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळाली आहे. रायगडच्या शिवसेना भाजपच्या सर्व आमदारांनी आदिती यांना पालकमंत्री करण्यास विरोध दर्शवला असल्याचे शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी म्हंटल आहे. सत्तेत सहभागी असूनही गोगावले यांनी तटकरे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने रायगड जिल्ह्यात आगामी काळात गोगावले विरुद्ध तटकरे असा संघर्ष पेटण्याची शक्यता आहे.