हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर २ दिवसांपूर्वीच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यावेळी शिंदे- फडणवीसांकडील काही खाती राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आली तर आधीच्या काही मंत्र्यांच्या खात्यात बदल करण्यात आला. मंत्रिमंडळ विस्तारात सुनील तटकरे यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या आमदार अदिती तटकरे (Aditi Tatkare) यांना महिला व बालकल्याण विभागाची जबाबदारी देण्यात आली. अदिती तटकरे यांच्या मंत्रिपदामुळे रायगडच्या पालकमंत्री पदाची चर्चा जोर धरत आहे, याबाबत हॅलो महाराष्ट्रने अदिती तटकरे यांच्याशी थेट संपर्क साधला असता त्यांनी पालकमंत्री पदाबाबत स्पष्ट सांगितलं.
रायगडच्या पालकमंत्रीपदी कोणाची निवड होईल हे आमचे वरिष्ठ नेते ठरवतील. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे याबाबत निर्णय घेतील. आमचे वरिष्ठ नेतेमंडळी जो काही निर्णय घेतील तो मान्य असेल आणि माझ्याकडून नेहमीच सहकार्याची भावना असेल असं अदिती तटकरे यांनी म्हंटल. यावेळी त्यांना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांच्या पुरुष आणि महिलांमध्ये फरक हा असतोच या विधानाबाबत विचारलं असता त्यावर मात्र अदिती तटकरे यांनी बोलणं टाळलं. मला गोगावले यांच्या विधानावर काहीच प्रतिक्रिया द्यायची नाही असं अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, महिला व बालविकास मंत्रिपद मिळाल्यानंतर पहिल्याच दिवशी अदिती तटकरे यांनी रायगड जिल्ह्यातून आपल्या कामांना सुरुवात केली. आदिती तटकरे यांनी सुधागड तालुक्यातील पाली येथील बेघरआळी अंगणवाडी केंद्राला भेट देऊन समस्या जाणून घेतल्या. तसेच इमारतीची पहाणी केली. या विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर राज्यातील महिलांसाठी असणाऱ्या अधिकाधिक योजना राबविण्याचा प्रयत्न करणार असून शक्य तितका न्याय देण्याचा प्रयत्न सुरू राहील असे मत आदिती तटकरे यांनी हॅलो महाराष्ट्रसोबत बोलताना व्यक्त केले.